भारतीय संविधान ही केवळ कायद्याची यंत्रणा नसून, ही रक्ताशिवाय घडवलेली सर्वात मोठी क्रांती आहे, असा ऐतिहासिक गौरव भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी विधानभवनात व्यक्त केला. त्यांच्या या विचारांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले.
महाराष्ट्राच्या सुपुत्राचा गौरव करण्यासाठी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भारतीय राज्यघटनेच्या सार्वभौमतेवर विशेष भर दिला. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, भारताची राज्यघटना ही देशात रक्तहीन क्रांती घडवण्यासाठीच तयार करण्यात आली आहे.
मागील 75 वर्षांत आपण याच तत्त्वांच्या अधिष्ठानावर वाटचाल केली, असे गवई यांनी ठामपणे सांगितले. गवई यांनी स्पष्टपणे नमूद केले की, घटनात्मक पदावर कार्य करताना, संविधानात नमूद मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संतुलन राखणं ही एक तारेवरची कसरत आहे. मात्र, हा प्रवास मी सदैव प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला.
सन्मानाने पूर्णत्वास
मी ज्या सभागृहात आज उभा आहे, त्या विधिमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. त्याच सभागृहात माझा गौरव होत आहे. यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी असू शकत नाही, अशा भावनांनी सरन्यायाधीश गवई गहिवरले. ते म्हणाले, माझा सत्कार म्हणजे महाराष्ट्राच्या सुमारे 13 कोटी जनतेचा मला दिलेला सन्मान आहे. हीच जनता माझी प्रेरणा आहे, आणि तिच्याच सेवेसाठी मला संविधानाने जबाबदारी दिली आहे.
गवई यांनी अभिमानाने सांगितले की, आपण संविधानाच्या अमृत महोत्सवानंतर शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. या काळात कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका, या तिन्ही घटकांनी भारतीय संविधानाला अभिप्रेत अशीच कामगिरी बजावली. त्यांनी स्पष्ट उदाहरण देताना सांगितले, महाराष्ट्रातील महार वतन उच्चाटन कायद्यामुळे हजारो वंचितांना जमिनी मिळाल्या. देशभरात भाडेपट्टा कायदा रद्द होऊन कोट्यवधी गरीब नागरिकांना त्यांचं वास्तवात असलेलं भू-संपत्तीवर अधिकार मिळाला. हेच सामाजिक व आर्थिक न्यायाचं प्रत्यक्ष रूप आहे.
परिवर्तनाच्या यशोगाथा
न्यायमूर्ती गवई यांनी भारतीय राज्यघटनेमुळे मिळालेल्या सामाजिक परिवर्तनाच्या विजयगाथा मांडल्या. ते म्हणाले, “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारे उघडून महिलांना मुख्य प्रवाहात आणले. आज त्या महिलाच राष्ट्रपती, पंतप्रधान, सचिव आणि न्यायमूर्ती म्हणून देश घडवतात. त्यांनी विशेषतः नमूद केले की, अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तींनी राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पोलीस महासंचालक, मुख्य सचिव यांसारखी सर्वोच्च पदे भूषवली. आणि आज बाबासाहेबांच्या विचारांचा एक प्रतिनिधी म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करतो, ही गोष्ट माझ्यासाठी भाग्याची आहे.
एक प्रेरणादायी व्रत
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपले विचार थेट संविधानाच्या आत्म्याशी जोडले. संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही, ते भारताच्या आत्म्याचं प्रतीक आहे. त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेली मूल्यं, तत्त्वं आणि अधिकार आजही प्रत्येक न्यायनिर्णयामागील दिशा दाखवतात. या गौरव सोहळ्याने महाराष्ट्राच्या विधिमंडळात न्यायप्रेम, संविधाननिष्ठा आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची नव्याने जाणीव करून दिली. न्यायमूर्ती भूषण गवई हे फक्त सरन्यायाधीश नाहीत, ते एका विचारधारेचे प्रतिनिधी आहेत, जिचं मूळ बाबासाहेबांच्या दूरदृष्टीत आहे.