लाडकी बहीण योजनेवरून राज्यात राजकीय घमासान चांगलंच पेटलं आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं की, आमचं उद्दिष्ट त्यांना फक्त एक हजार 500 नाही, तर लखपती बनवायचं आहे.
राज्यातील सत्तेच्या रंगमंचावर सध्या एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना जशी महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे, तशीच सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय परीक्षा बनली आहे. विरोधकांच्या मते, महायुतीने या योजनेच्या बळावर निवडणूक जिंकली, पण आता सरकारने ‘लाडक्या बहिणींचा’ विसर घेतला आहे. पैसे वेळेवर मिळत नाहीत, अटी कठीण आहेत, फक्त घोषणा होत आहेत, अशा संतप्त शब्दांत विरोधक राज्य सरकारवर तुटून पडले आहेत.
विरोधकांचा हा आरोप फेटाळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि महाआवास अभियान पुरस्कार वितरण कार्यक्रमात, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. लाडकी बहीण योजनेतून फक्त एक हजार 500 रुपये देऊन थांबायचं नाही, तर त्या महिलांना ‘दीदी’ बनवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे. दरवर्षी एक लाख उत्पन्न मिळेल अशी ताकद त्यांच्यात निर्माण करायची आहे. आमचा संकल्प आहे की, एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं.
सशक्तिकरणासाठी सज्ज
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. या मंचावरून फडणवीस यांनी विरोधकांना थेट उत्तर देताना आपल्या सरकारच्या योजना आणि संकल्पांची जाणीव करून दिली. त्यांनी नमूद केलं की, ही योजना केवळ निवडणुकीसाठी नव्हे, तर महिलांच्या सशक्तीकरणासाठी आहे. आम्ही त्यांना उद्योजिका, कुटुंब प्रमुख, आणि आर्थिक स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने काम करत आहोत.
या कार्यक्रमात शिवराजसिंह चौहान यांनी केंद्र सरकारच्या घरोघरी योजनांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, 20 लाख घरे केंद्र सरकारकडून मिळाली, नंतर आणखी 10 लाख मंजूर झाली आहेत. ही योजना केवळ निवारा देत नाही, तर नागरिकांचा आत्मसन्मान उंचावते. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आवास योजनेबाबत यशस्वी अंमलबजावणीचं श्रेय ग्रामविकास विभागाला दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, 100 दिवसांत 20 लाख घरांचं उद्दिष्ट ठरवलं होतं, ते आम्ही केवळ 45 दिवसांत पूर्ण केलं. नव्या टप्प्यातील सर्वेक्षणालाही केंद्राने परवानगी दिली आहे, आणि काम युद्धपातळीवर सुरू आहे.
योजनेचा हप्ता
महाराष्ट्रातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांना मिळणार आहे, असे स्पष्ट करत महिलांना दिलासा दिला आहे.
अदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत आढळले होते की काही सरकारी महिला कर्मचारीही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा लाभार्थींना तात्पुरता लाभ थांबवण्यात आला होता. तरीही, सर्व पात्र महिलांना हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केल्याने लाखो महिलांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या वट पौर्णिमेला लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कधीही जाहीर होऊ शकतात, आणि त्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजना एक ‘गेम चेंजर’ ठरू शकते. विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत असले, तरी फडणवीस यांनी योजनेची दिशा स्पष्ट केली आहे की, लखपती बनवण्याच्या मार्गावर आम्ही चाललो आहोत. त्यांच्या या विधानाने स्पष्ट होतं की, ही योजना अल्पकालीन लाभांपुरती मर्यादित नाही. महिला आर्थिक क्रांतीच्या मध्यवर्ती भूमिकेत आणण्याची ही सुरुवात आहे.