खामगावात रखडलेले रेल्वे मार्गाचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे. मात्र आता आकाश फुंडकर आमदार झाल्याने नागरिकांच्या त्यांच्याकडे अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे.
खामगाव रेल्वे मार्गाचा विकास हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी, आणि शेतकरी वर्ग यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. अनेक वर्षांपासून या मार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरणाच्या मागण्या प्रलंबित आहेत. रेल्वे मार्गाच्या अपूर्णतेमुळे प्रवास असुविधाजनक होत आहे. प्रवासी आणि व्यापारी वर्गाला यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खामगावचा औद्योगिक आणि आर्थिक विकासही बाधित होत आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या आमदार आकाश फुंडकर यांच्याकडे अपेक्षा आहे.
खामगाव-बडनेरा रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली, निवेदने दिली, परंतु अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. रेल्वे मार्गाची सुधारणा झाली तर या भागाचा नागरी, आर्थिक आणि सामाजिक विकास वेगाने होऊ शकतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. “आम्ही अनेक वर्षांपासून या मार्गाच्या विकासाची अपेक्षा करत आहोत. यामुळे खामगावसह परिसरातील गावांचा विकास होईल. रोजगाराच्या संधी वाढतील आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल, असे मत स्थानिक नागरिकांनी मांडले आहे. तर आता आमच्या अपेक्षा आकाश फुंडकर पूर्ण करतील असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
ठोस पाऊल उचलण्याची आशा
रेल्वे मार्गाच्या विकासामुळे शेतकऱ्यांना आपला माल इतर बाजारांमध्ये सहजतेने पोहोचवता येईल. प्रवाशांचा प्रवास वेळेत आणि कमी खर्चात पार पडेल. नागरिकांनी आता आकाश फुंडकर यांच्याकडे अपेक्षेच्या नजरा लावल्या असून, लवकरच या प्रश्नावर ठोस पाऊले उचलली जातील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
खामगाव शहरातील विकासाचे इतर मुद्देही प्रलंबित आहेत. शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शिर्ला डॅम प्रकल्पाची योजना 2005 मध्ये आखली गेली होती. त्यानंतर 2009 मध्ये कामाची वर्कऑर्डर निघून बारा वर्षे उलटून गेली तरीही ही योजना कार्यशील झालेली नाही. उन्हाळ्यात दहा ते बारा दिवसांनी नळाला पाणी येते, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
शहरातील रस्त्यांची स्थितीही चिंताजनक आहे. खामगाव-पंढरपूर महामार्गावरील गावंदरा गावाजवळ वारंवार अपघात होत आहे. आतापर्यंत पाच जणांचे बळी गेले आहेत. ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन करून संताप व्यक्त केला आहे.
शहराच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’ अभियानांतर्गत कामे हाती घेण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी 8 जून 2020 रोजी दिलेली स्थगिती 25 फेब्रुवारी 2021 रोजी हटविली आहे, ज्यामुळे या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. या विविध समस्यांमुळे खामगावच्या विकासात अडथळे येत आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडून या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.