महाराष्ट्र

Buldhana : विकासाच्या बंद दरवाज्यावर निष्क्रियतेचं कुलूप 

Gram Panchayat : तक्रारींचं वादळ आणि गावकऱ्यांचा संताप 

Author

असोला बु. गावात ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेचा कडवट संताप उफाळून आला आहे. सात सदस्यांच्या तक्रारीनंतरही चौकशीस गैरहजर राहिल्याने ग्रामपंचायत कार्यालयच सीलबंद करण्यात आलं.

बुलढाण्याच्या चिखलीतील असोला बु. या गावात ग्रामविकास अधिकारी संतोष सवडतकर यांच्या विरोधात वाढत्या तक्रारींमुळे गावात खळबळ उडाली आहे. गावच्या विकासाचा मुख्य भार खांद्यावर असलेल्या अधिकाऱ्याच्या वारंवार गैरहजेरीमुळे ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अखेर संतप्त सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून सीलबंद केल्याची घटना घडली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गावातील सात ग्रामपंचायत सदस्यांनी संतोष सवडतकर यांच्या कामकाजावर गंभीर आक्षेप घेतले आहे. त्यांनी चिखली येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशीचे आयोजन 15 मे रोजी करण्यात आले होते. विशेष म्हणजे ही चौकशी अधिकृत स्वरूपात असोला बु. ग्रामपंचायत कार्यालयात पार पडणार होती. गटविकास अधिकारी गजानन पोकळे स्वतः चौकशीसाठी उपस्थित होते आणि ग्रामपंचायत सदस्यही पूर्ण तयारीनिशी आले होते.

Police Transfer : नागपूरच्या सुरक्षा रणभूमीत तीन अधीक्षकांचे आगमन

नागरिकांमध्ये रोष

सर्व तयारी असूनही मुख्य व्यक्तीच अनुपस्थित राहिल्याने ग्रामपंचायत सदस्यांचा संयम सुटला. संतोष सवडतकर यांना चौकशी बाबत पूर्वसूचना देण्यात आली होती, तरीही त्यांनी या चौकशीला पूर्णतः दुर्लक्ष करत वरिष्ठांच्या आदेशालाही मान न घालता अनुपस्थित राहणे पसंत केले. यामुळे उपस्थित सदस्य आणि गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या निष्क्रियतेला कंटाळून आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व्यथित झालेल्या सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप लावून ते सीलबंद केले. तसेच या प्रकरणात त्वरित कारवाई व्हावी, या मागणीसह त्यांनी उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. गावकऱ्यांचा स्पष्ट आरोप आहे की, संपूर्ण गाव एकत्र येऊन विकासासाठी प्रयत्न करत आहे, परंतु ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या उदासीन वर्तनामुळे योजनांची अंमलबजावणीच होत नाही.

Nagpur : आक्षेपार्ह्य पोस्ट करणारा रजास सिद्दिक एटीएसच्या जाळ्यात

सततच्या तक्रारींचा इतिहास

संतोष सवडतकर हे गेल्या 13 वर्षांपासून असोला बु. येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी दाखल झाल्या आहेत. सह्याद्रीवेध पोर्टलसह महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर याची नोंद आहे. त्यामुळे सवडतकर यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चिखली पंचायत समितीने सदर तक्रारींची चौकशी सुरू केली असून वरिष्ठ अधिकारी लवकरात लवकर निष्कर्ष काढून योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

असोला बु. सारख्या गावातील नागरिक विकासाच्या अपेक्षेने पुढे येत असताना, प्रशासनातील काही जबाबदार व्यक्तींच्या दुर्लक्षामुळे या आशांवर पाणी फेरले जात असल्याचे दुर्दैवी चित्र या घटनेमधून समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने पाहून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करेल का? की पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या अपेक्षा आणि योजना कागदावरच राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!