राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वाढत आहेत. हे आरोप प्रत्यारोप धर्म, इतिहास आणि संस्कृतीवर उठले आहे. आता या वादाने वैयक्तिक जीवनावर देखील ठसे उमटवले आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि भाजपचे संदीप जोशी यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे नवनिर्वाचित आमदार संदीप जोशी यांच्यातील शाब्दिक युद्ध आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. प्रारंभी राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या स्वरूपात सुरू झालेला हा संघर्ष आता संस्कृती, इतिहास आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचला आहे. या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ उठले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या आधी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा उल्लेख करत गुढी उभारण्याच्या परंपरेबाबत वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती संभाजी महाराजांचा खून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी झाला, मग कशाला गुढी उभारायची? मी नाही उभारत गुढी-बिढी,” असे विधान वडेट्टीवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते संदीप जोशी यांनी जोरदार टीका करत काँग्रेसवर इतिहासाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.
संस्कृतीवरून घनघोर युद्ध
वादात आता दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप करण्यास सुरुवात केली आहे. संदीप जोशी यांनी मुलीसाठी बार उघडून देणाऱ्या वडेट्टीवारांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे,” अशी टीका केली. त्यावर वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत, राजकीय वाद असू शकतो, पण कुटुंबातील मुलीवर टीका करणे ही कुठली संस्कृती आहे? तुम्ही सणाच्या दिवशी मांसाहार करता, हे तुमच्या सनातनी संस्कृतीत बसते का? असा जोरदार सवाल केला.
संदीप जोशी यांनी गुढीपाडव्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा दाखला देत वडेट्टीवार आणि काँग्रेसवर टीका केली. गुढी उभारण्याची परंपरा ही महाभारत काळापासून आहे. संभाजी महाराजांच्या हत्येशी याचा काहीही संबंध नाही. काँग्रेस नेहमीच इतिहासाची दिशाभूल करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते, असे ते म्हणाले.
प्रकरण चव्हाट्यावर
वाद आता इतका तीव्र झाला आहे की वडेट्टीवार यांनी जोशी यांच्या खासगी आयुष्यावर टीका करत थेट इशारा दिला आहे. जो माणूस संस्कृती शिकवण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे स्वतःचे कोणते धंदे आहेत, हे आम्हाला माहिती आहे. एका हॉटेलमधील पूर्वी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी हा वाद आणखी वाढवण्याचा इशारा दिला आहे.
हा संघर्ष आता केवळ राजकीय न राहता वैयक्तिक स्वरूपाचा होत चालला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या दोन्ही नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप कोणत्या टप्प्यावर जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.