अमरावतीच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. बडनेरा आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पेटली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘एकला चलो’च्या घोषणेनंतर दोघांचे अहंकार समोरासमोर धडकले आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात चांगलाच वाकयुद्ध पेटलं आहे. एक हजार दोन हजार मतांनी निवडणूक जिंकून आलेल्यांनी मिजास दाखवू नये, असा घणाघात करत राणांनी खोडके यांच्यावर जहाल टीका केली. मात्र खोडके यांनीही राणांवर खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे. राणा म्हणजे मतांची वाट लावणारा नेता, असा टोला खोडके यांनी लगावला आहे. त्यामुळे अमरावतीच्या महापालिका निवडणुकीआधीच राजकीय रंगत वाढली आहे.
अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांच्यातील राजकीय वैमनस्य आता चव्हाट्यावर आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही एकला चलोचा नारा दिल्यामुळे सत्ताकारणात नवा पेच निर्माण झाला आहे. यातूनच दोघांमध्ये सुरू झालेलं वाकयुद्ध आता थेट वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचलं आहे.
राणांचा जोरदार हल्ला
एक कार्यकर्ता मेळावा घेताना रवी राणांनी खोडके यांच्यावर थेट नाव घेऊन हल्लाबोल केला. ते म्हणाले, संजय खोडके यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम केलं. त्यानंतर विधानसभेसाठी मला अजीत दादांचे 50 फोन आले. मला त्यांच्या मदतीसाठी सांगितलं गेलं. पण खोडके दोन हजार मतांनी निवडून आले आणि आता मोठं शोर माजवत आहेत. मी जर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं, तर मी त्यांना दहा हजार मतांनी हरवलं असतं. राणा यांची इतक्यावरच थांबली नाही. त्यांनी पुढे म्हटलं, हेच संजय खोडके तीनदा निवडणुकीत हरले आहेत. तरीही ते सुधारत नाहीत. सतत अहंकारात जगणाऱ्या लोकांचा अहंकार जनता चुराडा करून टाकते. त्यांना योग्य वेळ आली की उत्तर दिलं जाईल.
करारा पलटवार
राणांच्या या विधानानंतर संजय खोडके यांनीही लगेच पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, रवी राणा सतत मला धमक्या देतात. मी निवडणुकीत हरलो, याचं मला दु:ख नाही. पण राणा यांनी म्हटलं की, त्यांनी माझ्यावर तीन वेळा विजय मिळवलाय, म्हणजेच त्यांच्या पक्षाची एवढीच ताकद आहे की मला हरवण्यासाठी ‘माझा इतिहास’ वापरावा लागतो. खोडके यांनी राणांच्या अजीत पवारांचे फोन येण्याच्या दाव्यावरही जोरदार खंडन केलं. अजीत पवारांनी रवी राणांना एकही फोन केला नाही. उलट जेव्हा अजीत दादा अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आले होते, तेव्हा रवी राणांनीच त्यांना विनंती केली की संजय खोडके यांना मंचावर बोलवा,” असं खोडके यांनी ठामपणे सांगितलं.
यावरून खोडके यांनी पुढे भाष्य करताना सांगितलं, रवी राणा जिथे जातो, तिथे उमेदवारांची मते कमी होतात. त्यामुळे मी विधानसभेच्या निवडणुकीत त्याला माझ्यासोबत ठेवण्याचा निर्णय टाळला. जर राणा भाजपसोबत असतील, तर आम्ही त्यांच्या युतीत सहभागी होणार नाही. तसेच त्यांनी हेही आरोप केले की, अमरावती भाजप सध्या राणा चालवत आहेत. राणा म्हणजे सत्तेच्या नावाखाली व्यक्तिकेंद्रित राजकारण करणारा नेता आहे.
धगधगती लढत
या आरोप-प्रत्यारोपामुळे अमरावतीतील आगामी महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे खोडके यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे राणा यांनी खोडकेंना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुढे काय घडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण इतकं नक्की की या दोन नेत्यांच्या संघर्षामुळे अमरावतीतला राजकीय रंगमंच अजून गडद होणार आहे, मतदारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.
