महाराष्ट्र

Maharashtra Budget Session : विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवरून गोंधळ

Mahavikas Aghadi : आदित्य ठाकरे विरुद्ध विजय वडेट्टीवार

Author

महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आता थेट संघर्ष पेटला आहे. एकीकडे शिवसेना आदित्य ठाकरे यांना पुढे करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस विजय वडेट्टीवार यांच्या अनुभवी नेतृत्वावर भर देत आहे. या सत्तासंघर्षामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान सभेतील विरोधी पक्षनेता पदावरून जोरदार राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. उद्धव ठाकरे पुत्रप्रेमातून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करीत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. दुसरीकडं काँग्रेसमध्ये अनुभवी विजय वडेट्टीवार यांच्या दावेदारीला अधिक महत्त्व द्यावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

खुर्चीसाठीची ही लढाई आता केवळ दोन पक्षांपुरती मर्यादित राहिलेली नाही. संपूर्ण विरोधी पक्षामध्ये उभी फूट पडण्याचे चित्र यातून दिसत आहे. राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यावेळी हा मुद्दा केवळ विरोधकांच्या नेतृत्वाचा नाही. एका कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळं शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पदासाठी थेट लढत होणार आहे. यात काँग्रेस बाजी मारेल असं दिसत आहे.

Nana Patole : विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होणार!

घराणेशाहीचा अजेंडा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. हा निर्णय शिवसेनेच्या लोकशाहीवादी मूल्यांना हरताळ फासणारा आहे. आदित्य ठाकरे यांचा अनुभव आणि राजकीय परिपक्वता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. केवळ ठाकरे घराण्यातील असल्यामुळं आदित्य यांना हे पद दिले जात असेल, तर हा निर्णय घातक आहे. पक्षाचे हितसंबंध न पाहता कुटुंबाच्याच फायद्यासाठी हा निर्णय घेतला जाईल, असं बोललं जात आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत अस्वस्थता निर्माण होऊ शकते, असं सांगण्यात येत आहे.

काँग्रेस आग्रही

विधानसभेत काँग्रेसचा संख्याबळ अधिक आहे. त्यामुळं काँग्रेसलाच विरोधी पक्षनेतेपद दिलं जावं, अशी मागणी आहे. विजय वडेट्टीवार हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. यापूर्वी ते विरोधी पक्षनेतेही होते. त्यांना संसदीय कामाचा अनुभव आहे. कायदे तोंडपाठ आहे. आदित्य ठाकरे यांच्या बाबत अगदी उलट परिस्थिती आहे. वडेट्टीवार यांना प्रशासनातील माहिती देखील आहे. त्यांचा अनुभव पाहता त्यांनाच पद मिळेल असं सांगण्यात येत आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे आहे. येथे शिवसेनेचे अंबादास दानवे काम पाहात आहेत. असं असताना पुन्हा विधानसभेचे पद शिवसेना मिळण्याची शक्यता कमीच आहे. काँग्रेसमध्येही या मुद्द्यावर एकमत आहे. काँग्रेसमधील कोणीही आदित्य ठाकरे यांना पाठींबा देण्याच्या भूमिकेत नाहीत. काँग्रेसमध्येही अंतर्गत कलह आहेत. अलीकडेच या कलहांमुळं नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. अशात काँग्रेसमधूनही नव्या चेहऱ्याची मागणी होत आहे.

आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी फायद्याचे राहणार आहे. मात्र अद्याप पवार गटानं याबाबत स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त केलेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील या नियुक्तीवरून कोणता निर्णय घेतात, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. काँग्रेसला वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद मिळवून देण्यात यश आलं, तर हा शिवसेनेला मोठा धक्का असेल. त्यामुळं महाविकास आघाडीत कोण वरचढ ठरणार, हे बघणे रंजक ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!