महाराष्ट्र

Devendra Fadnavis : पितृछत्र नसलेल्या बुलढाण्यातील बालिकेसाठी सीएम बनले देवदूत

Tragic Accident : माहिती मिळताच धावले मदतीसाठी 

Post View : 46

Author

एक दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या मदतीमुळे एका मुलीला नवसंजीवनी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेने तिला मृत्युच्या दारातून वाचवले.

बुलढाणा जिल्ह्यातील एका लहानशा गावात, वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या एका 16 वर्षीय मुलीवर दुर्दैवाचा आघात झाला. रसवंती मशिनमध्ये केस अडकून गंभीर दुखापत झाल्यानंतर तिचं जीवन अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्काळ दिलेल्या आर्थिक मदतीमुळे तिच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली. अवघ्या दोन तासांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. या तातडीच्या निर्णयामुळे वेळेवर उपचार मिळाले आणि मृत्यूच्या छायेतून ती मुलगी परत आली.

16 वर्षीय ही मुलगी लहान वयातच मोठं कर्तृत्व दाखवत होती. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तिच्या नाजूक खांद्यावर आली होती. मोठी बहीण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, तर धाकटा भाऊ प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. आईच्या मदतीने ही मुलगी गावातील बसस्थानकावर रसवंती (गन्न्याचा रस) विकत होती. तिच्या मेहनतीने आणि चिकाटीने घराचा गाडा चालला होता. मात्र एका अपघाताने सद्ध्या हे सर्व थांबले आहे.

तातडीची मदत

रसवंती मशिन चालवत असताना तिचे केस मशिनमध्ये अडकले आणि ती गंभीर जखमी झाली. डोक्याला खोल जखम झाली, मेंदूवर सूज आली. तिला तातडीने जालना येथील कलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावकऱ्यांनी आणि सरपंच निवृत्ती कठोरे यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने मदत केली.

दुर्घटनेची माहिती ‘समाजभान’ या सामाजिक संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडे पोहोचवली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तातडीने मदतीची आवश्यकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती मिळताच, त्यांनी विलक्षण संवेदनशीलता दाखवत अवघ्या दोन तासांत एक लाख रुपयांची मदत मंजूर केली. रुग्णालय प्रशासनानेदेखील उर्वरित खर्च माफ केला आणि सामाजिक संस्थेने औषधांचा खर्च उचलला.

शिक्षणाची जबाबदारी

घटनेची माहिती मिळताच आमदार नारायण कुचे यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन मुलीची विचारपूस केली. या कुटुंबाची लढाई केवळ उपचारांपुरती मर्यादित नव्हती, तर तिच्या पुढील जीवनासाठी आधार देणेही आवश्यक होते. हे लक्षात घेऊन आमदार कुचे यांनी मुलीच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली.

चार लाखांपर्यंत येणाऱ्या उपचार खर्चात एक लाख रुपयांची मदत मिळाल्यानंतर आणि उर्वरित खर्च माफ झाले. मुलीच्या आईने अश्रू दाटलेल्या डोळ्यांनी मनोगत व्यक्त केलं. सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या मुलीचे प्राण वाचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, आमदार, सरपंच, समाजभान संस्था आणि रुग्णालयातील डॉक्टरांचे मी आयुष्यभर ऋण मानते. ही केवळ मदत नव्हे, तर आम्हाला पुन्हा जगण्याची उमेद मिळाली आहे.

ही घटना केवळ अपघाताची कथा नाही. संवेदनशील प्रशासन, सामाजिक संस्थांची तत्परता, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माणुसकीच्या राजकारणाचं जिवंत उदाहरण आहे. गरजूंच्या वेदनेशी तादात्म्य राखणारा प्रशासन यंत्रणा आणि मदतीचा वेगवान निर्णय यामुळे आज त्या मुलीचे प्राण वाचले, आणि तिचं कुटुंब पुन्हा उभारी घेण्याच्या मार्गावर आहे.

अभिजित कराळे | Abhijeet Karale

अभिजित कराळे | Abhijeet Karale

पत्रकारिता, बातम्या हा अभिजित यांच्या आवडीचा विषय. पत्रकारितेचा कोर्स केला नसला तरी त्यांनी न्यूज रिपोर्टिंगच्या आवडीतून त्यांनी आपलं लेखन कौशल्य विकसित केलं. ‘द लोकहित लाइव्ह’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतील आपला प्रवास सुरू केला. पुण्यातून त्यांनी संगणशास्त्र, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!