गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात प्रथमच ‘आनंदाची बस’ धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या बससेवेचा शुभारंभ झाला आहे. स्थानिक नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.
गडचिरोली जिल्हा हा राज्यातील शेवटचा जिल्हा आहे. जो अतिदुर्गम, अविकसित आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. मात्र, आता हा जिल्हा बदलतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीच्या विकासाला वेग मिळाला आहे. केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून हा बदल जाणवत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर येथे विकासाची मोठी चळवळ सुरू झाली आहे.
त्यांच्या प्रयत्नांतून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी या गावांना ‘आनंदाची बस’ मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने येथील नागरिकांच्या मागणीनुसार बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. ही बस म्हणजे केवळ वाहतुकीचे साधन नाही तर दुर्गम भागातील लोकांसाठी विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
विकासाच्या प्रवासाला गती
गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री असताना फडणवीस यांना निवेदन दिले होते, ज्यामध्ये रुग्ण, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांसाठी बससेवेची मागणी केली होती. संवेदनशीलतेने याची तातडीने दखल घेत फडणवीस यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय नियंत्रकांना बससेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी या गावांसाठी बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या.
मुरूमगाव येथे सध्या तीन बसेसद्वारे 10 फेऱ्या, पेंढरी येथे तीन बसेसद्वारे 8 फेऱ्या, तर रांगी येथे दोन बसेसद्वारे सहा फेऱ्या चालवल्या जात आहेत. यामुळे या गावांतील रहिवाशांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे सुलभ झाले आहे. रोजच्या प्रवासात मुरूमगावहून 285, पेंढरीहून 335 आणि रांगीहून 242 प्रवासी बसचा वापर करीत आहेत.
मुख्यमंत्र्यांचा बस प्रवास
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला ही गावे आहेत. येथून केवळ नऊ किलोमीटरवर छत्तीसगड राज्य आहे. अशा दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी बससेवा म्हणजे मोठी सुविधा ठरली आहे. आता त्यांना तालुक्याच्या ठिकाणी सहज जाता येते, दवाखान्यात उपचार घेता येतात आणि कार्यालयीन कामेही सोयीस्कररीत्या करता येतात.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीला केवळ नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून नाही, तर एक औद्योगिक केंद्र म्हणून ओळख मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गडचिरोलीला ‘स्टील हब’ बनविण्याच्या दिशेने त्यांनी पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे, अलीकडेच त्यांनी स्वतः बसने प्रवास करत या भागातील नागरिकांशी संवाद साधला आणि गडचिरोली विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असल्याचा विश्वास दिला.
