
अमरावतीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासाचे नवे पर्व सुरू झाले. शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठी दिलासादायक घोषणा आणि प्रकल्पांची भरघोस मेजवानी झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे विदर्भाच्या मातीला विकासाचे नवे वारे लागले आहेत. अमरावतीत आज त्यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात एकाच दिवशी अनेक महत्त्वाच्या घोषणा आणि लोकार्पण सोहळ्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या आशा-आकांक्षांना नवे पंख लाभले. शेतकऱ्यांना दिलासा देणारे सानुग्रह अनुदान, अमरावती विमानतळाचे लोकार्पण, पायलट ट्रेनिंग सेंटर, टेक्स्टाईल पार्क, मेडिकल कॉलेज अशा अनेक प्रकल्पांची घोषणा करत फडणवीस यांनी विदर्भाच्या पुनरुत्थानाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना 831 कोटी रुपयांच्या सानुग्रह अनुदानाच्या पहिल्या टप्प्याचे वाटप करण्यात आले. 2006 ते 2013 दरम्यान सिंचन प्रकल्पांसाठी थेट खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात आता अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे झालेल्या भव्य समारंभात फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा निर्णय अमलात आला.
प्रकल्पबाधितांसाठी मोठा दिलासा
शासनाच्या निर्णयानुसार पश्चिम विदर्भातील 14 हजार 149 हेक्टर जमिनीच्या मोबदल्यात 700 कोटी आणि पूर्व विदर्भातील 2 हजार 484 हेक्टर जमिनीसाठी 124 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 7 हजार 291 हेक्टर भूसंपादन झाल्याने, 474 कोटी रुपयांचा निधी इथल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात दिलासा निर्माण झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक 19.21 लाख रुपये प्रति हेक्टरचे अनुदान मंजूर झाले आहे. तसेच यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचाही मोठा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पबाधितांसाठी न्यायालयीन लढ्यांची गरज संपुष्टात येणार आहे व शासनाशी असलेला संवाद अधिक सुलभ होणार आहे.
विमानतळाचे भव्य लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीने अमरावती जिल्ह्यात नांदगाव पेठ MIDC येथे भव्य टेक्स्टाईल पार्कची उभारणी केली जाणार आहे. यामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विदर्भातील पारंपरिक कापूस क्षेत्राला औद्योगिक जोड मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूर करण्यात आलेले 1600 कोटी रुपये आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवतील.
स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. विदर्भाच्या हृदयात आता हवाई उड्डाणांची गती वाढणार आहे. अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याच ठिकाणी एशिया खंडातील पहिले पायलट ट्रेनिंग सेंटरही स्थापन करण्यात येणार आहे, ही बाब अमरावतीसाठी अत्यंत अभिमानाची ठरणार आहे. हवाई सेवा आणि प्रशिक्षण क्षेत्रातील ही पायरी जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर नेईल.