
माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीचा शतकोत्तरी रौप्य महोत्सव चंद्रपुरात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मारोतराव कन्नमवार यांचा शतकी जयंती महोत्सव साजरा व्हायला हवा होता. काही कारणांमुळं हा सोहळा साजरा झाला नसेल. आपण मात्र भाग्यवान आहोत. आपल्याला कन्नमवार यांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवाचा भाग होता आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात त्यांनी केलेलं भाषण तुफान व्हायरल होत आहे. चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, शोभा फडणवीस, आमदार सुधाकर आडबाले, आमदार देवराव भोंगळे, अशोक जीवतोडे, राहुल कन्नमवार, राजेंद्र कन्नमवार, संदीप गड्डमवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, कन्नमवार यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या सारख्या नेत्यांचा भावी पिढीला विसर पडता कामा नये. कन्नमवार यांच्या कार्याबद्दल नवीन पिढीला सातत्यानं माहिती होत राहायला हवी. चंद्रपूर हा वाघांचा आणि वारांचा जिल्हा आहे. चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार हे तर भाजपचे नेते आहेत. विजय वडेट्टीवार, किशोर जोरगेवार हे देखील वाघांच्या आणि वारांच्या जिल्ह्यातील आहेत. वार कोणतेही असो आम्हाला ते चालतात. त्याचे कारण म्हणजे आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत, असं फडणवीस म्हणाले.

प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
वार आणि हेडगेवार हे कॉम्बिनेश फडणवीस यांनी साधताच कार्यक्रमाच्या ठिकाणी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. वार हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात जोडलेले दिसतील असंही फडणवीस म्हणाले. आपल्या या वक्तृत्व शैलीतून त्यांनी मारोतराव कन्नमवार यांना अभिवादन केलं. मारोतराव कन्नमवार ज्या समाजातून येतात, तो समाज मेहनती समाज आहे. तुलनेने या समाजाची संख्या कमी आहे. पण मारोतराव कन्नमवार यांनी केलेलं काम अविस्मरणीय असंच असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.
मारोतराव कन्नमवार यांनी स्वबळावर आपलं व्यक्तीमत्व तयार केलं. शिक्षण आणि इतर सुविधा त्या काळात कमी होत्या. परंतु त्यानंरही देशप्रेमानं ओतप्रोत होत त्यांनी कार्य केलं. वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये, स्वातंत्र्य लढ्यातही कन्नमवार यांचं योगदान अमूल्य असल्याचं फडणवीस म्हणाले. कन्नमवार हे राष्ट्रप्रेमाच्या ध्येयवादानं प्रेरीत होते. देशप्रेम हेच त्यांचे ध्येय होतं. स्वतंत्र विदर्भासाठी त्यावेळी आंदोलन सुरू होतं. त्यावेळी मराठी भाषकांच्या एकीसाठी साद देण्यात आली. त्याला कन्नमवारांनी साथ दिली.
यशवंतराव चव्हाण यांनाही कन्नमवार यांनी पाठबळ दिलं. त्यामुळं केवळ विदर्भासाठीच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्रासाठी असलेलं कन्नमवार यांचं योगदानही अजरामर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. युद्धाच्या काळात मारोतराव कन्नमवार यांनी राज्याची धुरा सांभाळली. देशासाठी त्यावेळी करण्यात आलेलं निधी संकलनही सर्वोत्तम होतं, असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.