
भारताने ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहिम राबवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ स्थापन केलं आहे. हे शिष्टमंडळ प्रमुख देशांना भेट देत भारताची भूमिका आणि पुरावे मांडणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई केवळ लष्करी नव्हे, तर रणनीतीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुढील टप्प्याचं संकेत ठरली आहे. आता भारत सरकार थेट जागतिक व्यासपीठांवर उतरत आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या नीतीचा पर्दाफाश करण्यासाठी एक भक्कम राजनैतिक मोहीम उघडणार आहे. यासाठी केंद्र सरकारने संसदेतल्या विविध पक्षांतील अनुभवी खासदारांचं निवडक शिष्टमंडळ तयार केलं आहे.
खासदारांचे हे शिष्टमंडळ 22 मेपासून 10 दिवसांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर रवाना होणार आहे. या शिष्टमंडळात पाच ते आठ प्रमुख देशांना भेटी देण्यात येणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमधील स्थायी व अस्थायी सदस्य देश हे मुख्य लक्ष्य ठरवण्यात आले आहे. शिष्टमंडळाच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या भेटींत भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतलेली कारवाई, तिच्यामागचं धोरण आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबद्दलचे ठोस पुरावे जगासमोर ठेवले जाणार आहेत. या शिष्टमंडळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जागतिक मंचांवर भारत
फडणवीस म्हणाले, ही अतिशय योग्य आणि ठाम पावले आहेत. अनुभवी खासदारांचा समावेश असल्याने भारताची खरी भूमिका जगभरातील देशांपर्यंत पोहोचेल. पाकिस्तानचा खरा चेहरा जो दहशतवादाच्या सावलीत लपलेला आहे. तो आता उघड होईल. फडणवीसांनी यावेळी भारताच्या डिप्लोमसीचंही कौतुक केलं आणि सांगितलं की, युद्धाचं सत्य, शांततेसाठी भारताची कटिबद्धता आणि पाकिस्तानच्या कुरापती हे सर्व थेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं ही या मोहिमेची मोठी उपलब्धी ठरेल.
राजनैतिक मोहिमेमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, द्रमुकच्या कनिमोझी, जेडीयूचे संजय कुमार झा आणि शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय, काँग्रेसकडून आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांचीही नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारत थेट पाकिस्तानविरोधी पुरावे सादर करणार आहे.
Devendra Fadnavis : जनतेच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात
यामध्ये दहशतवाद्यांच्या हालचालींचे अचूक पुरावे, हल्ल्यांतील पाकिस्तानचा सहभाग, आणि भारताच्या शांततेविषयीच्या भूमिकेची ठोस मांडणी केली जाईल. पाकिस्तानने आतापर्यंत झाकून ठेवलेली आपली भूमिका आता जगासमोर येणार असून, भारताचं हे राजनैतिक पाऊल केवळ देशाचं नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियाच्या स्थैर्याचं प्रतिनिधित्व करणार आहे.