राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, मुंबई बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट टिप्पणी केली आहे.
राजकीय पटलावर ठाकरे बंधूंची युती म्हणजे एका नव्या सुरुवातीची जणू भव्य सुरुवात वाटली होती. पाच जुलै 2025 रोजी, दोन दशकांच्या वैरानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी हात मिळवले, गळाभेट घेतली आणि एकत्र येत मुंबई महापालिकेवर आपल्या वर्चस्वाची स्वप्ने रंगवली. सर्वांच्या नजरा या नव्या जोडीकडे लागल्या होत्या. मात्र, पहिल्याच निवडणुकीच्या मतपेटीतून ठाकरे बंधूंना निराशेचा धक्का बसला. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नाही. जणू काही त्यांच्या ब्रँडला कोणाची नजर लागलीच. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा ‘ब्रँड’ टिकेल की संपुष्टात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर तिखट प्रहार करत राजकीय वातावरण गरम केले आहे.
फडणवीस म्हणाले, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत काही लोक म्हणत होते की त्यांच्याकडे ब्रँड आहे. पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव यांनी त्यांच्या ब्रँडचा बँडच वाजवला. बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड होते, ठाकरे बंधू नव्हे, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली. मुंबईतील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत म्हणाले, आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड झाला. नरेंद्र मोदी हा जगातील सर्वात मोठा ब्रँड आहे. या शब्दांनी फडणवीसांनी ठाकरेंना डिवचले. मेळाव्यात फडणवीसांनी भूतकाळ उगाळत ठाकरेंच्या विश्वासघाताची आठवण करून दिली. गेल्या वेळी शिवसेनेचा महापौर व्हावा अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. आम्ही क्षणाचाही विलंब न लावता त्यांना साथ दिली.
Randhir Sawarkar : शेतकऱ्यांच्या आशेची निळकंठ सूतगिरणी पुन्हा कार्यान्वित
गनिमी काव्याचा दणका
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष सगळे तुम्ही घ्या. आम्ही विरोधक म्हणून काम करणार नाही, पण चुकलात तर अंकुश ठेऊ, असे सांगितले होते. परंतु 2019 निवडणुकीत त्यांनी विश्वासघात केला, जणू ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का’ हे गाणे गावे लागले. फडणवीसांच्या या शब्दांनी हास्याची कारंजी उडाली, पण त्यातून राजकीय खोचकपणा स्पष्ट झाला. अमित साटम यांनीही विरोधकांवर ब्राह्मोस मिसाईलसारखा हल्ला चढवला. आपल्याला कोणी आता थांबवू शकत नाही. मागच्या वेळी थोडक्यात वाचलो होतो, दोनच नगरसेवक कमी पडले होते. कमी पडल्यावर काय करायचे ते आम्हाला माहिती आहे, असे साटम म्हणाले. फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला की, यावेळी मुंबई महापालिकेत महायुतीच जिंकेल आणि महापौरही महायुतीचाच असेल.
फडणवीसांनी ठाकरेंच्या ब्रँडवर पुन्हा प्रहार करत म्हणाले, साधी बेस्टची निवडणूक होती. आम्ही म्हणालो कशाला पक्षावर लढायचे? तर ते म्हणाले आमचा ब्रँड आहे. आमचे शशांक राव, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी या ब्रँडचा बँड वाजवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड आहेत, तुम्ही नव्हे, असे ते म्हणाले. आमच्याकडे अमित साटमसारखा सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होतो. चहा विकणारा जागतिक ब्रँड होतो, असा उल्लेख करत फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाही, असे फडणवीस म्हणाले. 2022 मध्ये आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आणले. काहीही झाले तरी, कोणी सोबत आले तरी किंवा नाही तरी, मुंबईत महायुतीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. या शब्दांनी मेळावा दणाणून गेला. ठाकरे बंधू या टीकेला कसे उत्तर देतात, की ते नव्या रणनीतीने परत येतात, हे वेळच सांगेल.