
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपुरात भव्य आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय उभारले जाणार आहे.
महाराष्ट्रातील समृद्ध आदिवासी वारशाला जपण्याचा आणि जागतिक स्तरावर नेण्याचा एक भव्य प्रयत्न नागपूरात साकार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि दृढ पुढाकारातून सुराबर्डी येथे गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय उभारले जाणार आहे. सुमारे 15 एकर क्षेत्रफळावर उभ्या राहणाऱ्या या भव्य संग्रहालयासाठी तब्बल 132 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे.
सादरीकरणाद्वारे प्रकल्पाचा आराखडा मांडण्यात आला. ज्यामध्ये आदिवासी जीवनशैली, संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यावर भर देण्यात आला आहे. हे संग्रहालय केवळ एक दालन न राहता, आदिवासी जीवनशैलीचा एक जिवंत दस्तावेज ठरेल. या संग्रहालयात गोंड, भिल्ल, कोलाम, कोरकू, वारली, महादेव कोळी, कातकरी, पारधी अशा विविध आदिवासी समाजांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक पैलूंना उजाळा दिला जाणार आहे. या माध्यमातून नृत्य, संगीत, पारंपरिक वाद्य, कपडे, दागिने आणि शिल्पकलेचे दर्शन होईल.

Shalarth ID scam : नागपूरनंतर अमरावती विभागातही चौकशीची सुरुवात
पर्यावरणपूरक बांधकाम
समुदायांनी स्वातंत्र्य संग्रामात दिलेले योगदान, त्यांच्या पारंपरिक प्रथा, परंपरा आणि संघर्षांचेही चित्रण केले जाईल. संग्रहालयाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांच्या वारशाला जतन करण्याचा उद्देश आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत संग्रहालय अधिक आकर्षक माहितीपूर्ण आणि परस्परसंवादी बनवले जाणार आहे. ही वास्तू केवळ सांस्कृतिक नव्हे तर पर्यावरणपूरक तत्त्वांवर आधारित असणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा, भरपूर झाडांची लागवड आणि एआयचा वापर हे या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य असेल.
विशेष म्हणजे, या संग्रहालयाच्या बांधकामात सावनेर स्टोन या स्थानिक दगडाचा वापर करून वास्तुकलेला स्थानिकतेचा स्पर्श दिला जाणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. 30 मे पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्धार आहे. जून महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री अशोक उईके यांनी दिली. आदिवासी संस्कृती जिवंत ठेवणारे आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे हे संग्रहालय भविष्यात एक महत्त्वाचा सांस्कृतिक केंद्रबिंदू ठरेल, असेही ते म्हणाले.