
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षा वाढवण्याची पावले उचलली गेली. 12 मे रोजी फडणवीस यांनी उच्चस्तरीय समन्वय बैठक घेतली.
भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली सुरक्षा अधिक मजबूत आणि व्यापक केली आहे. याचा परिमाण म्हणून महाराष्ट्रातही याचे स्पष्ट पडसाद उमटू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये वाढत असलेल्या तणावाला लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात येत आहेत. भारतीय लष्कराच्या धडक कारवाईनंतर राज्यात सुरक्षेचा धागा अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 मे रोजी एक अत्यंत महत्त्वाची समन्वय बैठक घेतली.
बैठकीत त्यांनी थेट सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधत राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचं जोरदार समर्थन करत मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय जवानांनी पाकिस्तानात घुसून त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या लष्करी तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यात आला आहे.

शांततेसाठी प्रशासन सज्ज
बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, राज्याच्या नागरी सुरक्षेबाबत ही एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक बैठक ठरली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शांतता व सुरक्षिततेचं वातावरण निर्माण राहावं यासाठी प्रशासन सज्ज आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Praful Gudadhe Patil : फडणवीसांचा विजय न्यायालयाच्या कटघऱ्यात
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून देशात युद्धसदृश वातावरण आहे. याआधी आम्ही विविध यंत्रणांच्या बैठका घेतल्या, मात्र सैन्य अधिकाऱ्यांशी थेट चर्चा होणं शक्य झालं नव्हतं. आजच्या बैठकीत आम्ही त्यांच्या अपेक्षा ऐकल्या आणि आमच्या बाजूच्या चिंता मांडल्या. सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यातील रणनीती, सजगता वाढवण्यासाठी कोणती पावलं उचलावी लागतील यावर सविस्तर चर्चा झाली.
समन्वयाने सुरक्षित राज्य
राज्यातील संभाव्य धोके, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा आणि लष्कर व राज्य प्रशासन यांच्यातील समन्वय यावरही भर देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, राज्य सरकार आणि सैन्य यांच्यातील समन्वय पूर्वीपासून मजबूत होता, मात्र आता तो अधिक सशक्त करण्याची गरज आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच ते एक अतिसंवेदनशील शहरही असल्याचे फडणवीस म्हणाले.
पाकिस्तान थेट युद्ध करू शकत नाही, म्हणूनच ते युद्धाचा मार्ग अवलंबतात. अशा वेळी मुंबईसारख्या शहरांची सुरक्षा ही प्राथमिकता असते. यासाठी कायदाप्रवर्तन यंत्रणा आणि लष्कर यांच्यात प्रभावी समन्वय कसा साधता येईल, यावर बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, विविध विभागांनी समन्वय साधत धोरणात्मक पावलं उचलण्याची गरज आहे. आम्हाला आता स्पष्ट दिशा मिळाली आहे की कोणत्या क्षेत्रात अधिक लक्ष द्यावं लागेल. भविष्यात या मार्गदर्शनानुसारच आम्ही आमचं काम पुढे नेऊ, असंही त्यांनी नमूद केलं.