राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या विशेष मोहिमेला आता ठोस कृतीची जोड मिळाली आहे. अनुकंपा नियुक्तीप्रक्रियेत वर्षानुवर्षे अडकलेली अनेक प्रकरणं आता मार्गी लागणार आहेत. यामागे ठाम भूमिका बजावणारे आणि यवतमाळ जिल्ह्याच्या प्रशासनाला ठोस निर्देश देणारे व्यक्ती म्हणजे पालकमंत्री संजय राठोड. त्यांच्या स्पष्ट आदेशांमुळे जिल्ह्यातील विविध विभागांनी आता झपाट्याने काम सुरू केलं आहे.
पालकमंत्री राठोड यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व विभागप्रमुखांना आदेश दिले की, अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली पाहिजे. शासनाने दिलेल्या कालमर्यादेत सर्व कामकाज पूर्ण करून उमेदवारांना वेळेवर नियुक्ती आदेश द्या. या अनुषंगाने आता जिल्ह्यात अनुकंपा नियुक्तीसाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही होत आहे. शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असून, प्रत्येक विभागाला यासाठी जबाबदार ठरवण्यात आलं आहे.
Yavatmal : ट्रकवर राज्यमंत्र्यांचं नाव, आतमध्ये विदेशी दारूचा साठा
प्रस्ताव सादर
15 ऑगस्टपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. उमेदवारांची प्रतीक्षा यादी अद्ययावत केली जाईल, त्यांचे गटांतील बदल विनंतीनुसार करण्यात येतील आणि रिक्त पदांची तपासणी पूर्ण होणार आहे. विशेषतः गट ड मधील मृत घोषित पदे पुनर्जीवित करून शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 18 ऑगस्टला जिल्हाधिकारी या संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत उपलब्ध पदसंख्या, पात्र उमेदवारांची स्थिती आणि शिफारशी यांची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर गट क ची सामायिक प्रतीक्षा यादी अद्ययावत केली जाईल.
22 ऑगस्टपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. गट ड च्या रिक्त पदांच्या पुनरुज्जीवनासह उमेदवारांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव शासनास सादर केला जाणार आहे. 1 सप्टेंबरला अनुकंपा उमेदवारांचा विशेष मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली जाईल. याआधी सर्व विभागांनी आपापली प्रक्रिया पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
Chandrashekhar Bawankule : चेहरा दाखवा, काम करा; गमंत नाही, ही चोख शिस्त
ढिलाई खपवणार नाही
15 सप्टेंबरपासून गट क आणि गट ड मधील नियुक्ती आदेश वाटप सुरू होणार आहे. पालकमंत्री राठोड यांनी यावर भर देत सांगितले की, गट ड ची पुनर्जीवित पदे आणि गट क मधील पात्र उमेदवारांची नियुक्ती ही प्राधान्याने केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही. या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नियुक्ती प्राधिकारी आणि विभाग प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मोहन जोशी हे देखील उपस्थित होते.
बैठकीत स्पष्ट निर्देश देण्यात आले की, शासनाने जसे टप्पेवार वेळापत्रक निश्चित केले आहे, त्यानुसार सर्वच विभागांनी तातडीने कारवाई करून पुढील आढावा बैठकीसाठी आपापली माहिती सादर करावी. संजय राठोड यांच्या सक्रियतेमुळे, जिल्ह्यातील असंख्य कुटुंबांना नोकरीचा आधार मिळणार आहे. आता वाट पाहणाऱ्या अनुकंपा उमेदवारांना वेळेत न्याय मिळणार असून, ही प्रक्रिया राज्य शासनाच्या कार्यक्षमतेचं प्रतिक ठरणार आहे. या अभूतपूर्व निर्णयामुळे प्रशासन आणि समाजात सकारात्मक लाट पसरली असून, भविष्यात अशाच तत्परतेने अनुकंपा प्रक्रिया नियमित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.