अकोला भाजपमध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. काही ठराविक नेते हिटलरशाही करीत आहेत. यातूनच भाजप नेते संजय गोटफोडे यांची तक्रार झाली आहे.
एखाद्या पक्षाला रामराम ठोकलेल्यांची नाराजी आपण समजू शकतो. परंतु पक्षात सक्रिय असतानाही नेत्यांची होणारी तक्रार गंभीर ठरते. असाच प्रकार अकोल्याच्या भाजपमध्ये झाला आहे. अकोला भाजपमध्ये सध्या काही नेत्यांची हिटरलशाही सुरू आहे. याबद्दल अनेकांची नाराजी आहे. अशाच हिटरशाहीचा आरोप भाजपचे सरचिटणीस संजय गोटफोडे यांच्याविरोधात झाला आहे. भाजपच्या एका सक्रिय सदस्यानं याबाबत थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडं लेखी तक्रार केली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयातून याविषयाला दुजोरा मिळाला आहे. लवकरच याची दखल घेतली जाणार आहे, असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं.
संजय गोटफोडे यांनी फोटोच्या मुद्द्यावरून डावलल्याचा आरोप तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यानं केला आहे. विशेष म्हणजे हा कार्यकर्ता भाजपशी एकनिष्ठ आहे. संजय गोटफोडे यांच्यावर झालेले आरोपही साधे नाहीत. एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या पदांवर घेतल्याचा त्यांच्याविरोधात आरोप आहे. त्यामुळं भाजपला नवीन लोक सापडत नाही का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्याच्या भाजपमध्ये ही अराजकता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत तर ही बंडखोरी चांगलीच बघायला मिळाली होती, असा आरोप पुन्हा झाला आहे.
कार्यकारिणीवर अविश्वास
भाजपमधील तक्रारकर्ता कार्यकर्ता चांगलाच दुखवला आहे. त्याने थेट प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडं तक्रार केली आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांचाच काय तर कोणाचाच महानगर किंवा जिल्हा कार्यकारिणीवर विश्वास नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या पदांवर का स्थान दिलं जातय? असा प्रश्न अशा तक्रारीमुळं उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे काही ठराविक नेत्यांची चाटुगिरी करणाऱ्यांना अकोल्यात भाजपमध्ये पद मिळतं. नेत्यांचे बूट पॉलिश करणाऱ्यांना विमानतळावर स्वागतासाठी बोलावण्यात येतं, ही कार्यकर्त्यांची खदखद पुन्हा एकदा अनेकांनी ‘द लोकहित लाइव्ह’जवळ बोलून दाखवली.
भाजपमधील काही नेते आतापासूनच महापालिका निवडणुकीसाठी कोण तिकिट वाटप करणार हे सांगत सुटले आहेत. तिकिट वाटप आमच्याच हातात आहे. चंदूभाऊ बावनकुळे काय किंवा रविभाऊ काय आम्ही सांगू तेच ऐकतील, अशी धमकी इच्छुकांना दिली जात असल्याचा थेट आरोप आहे. सध्या भाजपकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज भरताना कोणाला कशी वागणूक मिळत आहे, हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर सभेत ऐकण्याचे धाडस दाखवावे, असं ‘ओपन चॅलेंज’ आता कार्यकर्ते देऊ लागले आहे. त्यामुळं अकोला भाजपमध्ये खरोखर चाललंय काय? असं विचारण्याची वेळ आली आहे.
रविभाऊ कोण महत्वाचे?
निष्ठावान कार्यकर्ता दुखावला की काय होतं, हे भाजपनं अकोल्यात पाहिलं आहे. अकोला पश्चिम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे दात लोकांनी विशेष करून कार्यकर्त्यांनीच घशात घातले. शेवटपर्यंत भाजपसोबत कार्यकर्ते नव्हते. जेव्हा कार्यकर्ते मैदानात उतरले, तोपर्यंत उशिर झाला होता. यातून भाजपनं कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. संजय गोटफोडे यांच्या वागणुकीतून तरी हेच दिसत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण कार्यकर्ते जपणार की, बोटावर मोजण्याइतके नेते, असा सवाल कार्यकर्त्यांनी या तक्रारीच्या निमित्तानं उपस्थित केला आहे. सध्या या तक्रारीचीच चर्चा अकोला भाजपमध्ये आहे.
याबाबत ‘द लोकहित लाइव्ह’ने संजय गोटफोडे यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘आपण कसा कोणताही प्रकार केलेला नाही. कोणतेही पद आपण स्वत: फायनल करीत नाही. पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल आणि जयंत मसने हे पदांबाबत निर्णय घेतात. आपण तिसऱ्यांदा सरचिटणीस म्हणून काम करीत आहोत. आपली वागणूक चुकीची असती तर पक्षाने ही संधी दिली नसती. उलट आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आपण सौजन्यानं वागणूक देतो. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे काही मंडळी भाजप आणि आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्यापासून कोणताही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कधीही दुखावलेला नाही. आपण ग्राहक पंचायतमध्येही काम केले आहे. कोणत्याही व्यक्तीला आपल्याबद्दल विचारायला हवे. आपल्या वागणुकीबद्दल सगळे सकारात्मक आणि चांगलेच बोलतील.’
