महाराष्ट्राच्या विधिमंडळात काँग्रेसनं नेत्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीत नानांच्या कट्टर समर्थक असलेल्या आमदाराला ‘चीफ व्हिप’ करण्यात आलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून अलीकडेच आमदार नाना पटोले यांची उचलबांगडी झाली. त्यांना विधिमंडळ गटनेला पदापासूनही दूर ठेवण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष पद हर्षवर्धन सपकाळ यांना मिळालं. विजय वडेट्टीवार हे गटनेता झालेत. आता नानांच्या एका मोठ्या समर्थकाला विधान परिषदेत ‘चीफ व्हिप’ करण्यात आलं आहे. आमदार अभिजित वंजारी हे त्यांचं नाव. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्र विधिमंडळातील नेत्यांची नियुक्ती केली. त्यासंदर्भातील पत्र के.सी. वेणूगोपाळ यांनी काढलं. त्यात विदभ्र्ज्ञातील या एकमेव आमदाराचं नाव आहे.
नाना पटोले यांच्या जागेवर नवीन प्रदेशाध्यक्ष नेमताना राहुल गांधी यांच्यापुढं बरेच मोठं आव्हान होतं. त्यांना विदर्भातीन प्रदेशाध्यक्ष नको होता. त्यातल्या त्यात भाजपच्या काही ठराविक नेत्यांच्या जवळ असलेला नेता तर अजिबातच नको होता. परंतु लोकसभा निवडणुकीत विदर्भानं काँग्रेसला साथ दिली. ही बाब अनेकांनी राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष विदर्भातील नेमावा, असा सल्ला अनेकांनी राहुल यांना दिला. परिणामी कोणाच्याही ध्यानी मनी नसलेलं हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव राहुल गांधी यांना सूचलं.
https://x.com/INCMaharashtra/status/1895700851291037801?t=BWPvkED9HbGnh58G5l_RAg&s=08
मोठा जबाबदारी
हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्यासोबत ‘वन टू वन’ काम केलं आहे. त्यामुळंच अनेकांची नावे बाजूला करीत सपकाळ यांना अध्यक्ष करण्यात आलं. विधान सभेतही गटनेता नेमतानाही काँग्रेसनं ही काळजी घेतली. वडेट्टीवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किवां भाजपशी हातमिळावणी करणारे नाही, असा ‘फिडबॅक’ राहुल यांना मिळाला होता. अशीच खबरदारी विधिमंडळातील नेत्यांची नियुक्ती करताना घेण्यात आली आहे. अमिन पटेल यांना विधान सभेतील उपनेता करण्यात आलं आहे. अमित देशमुख यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होतं. त्यांना ‘चीफ व्हिप’ करण्यात आलं आहे. विश्वजित कदम हे सचिव असतील. शिरीश कुमार नाईक आणि संजय मेश्राम यांनाही ‘व्हिप’ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विधान परिषदेत मात्र सतेज उर्फ बंटी पाटील यांना गटनेता करण्यात आलं आहे. या सभागृहात मात्र व्हिप काढण्यासाठी आमदार अभिजित वंजारी यांना प्रमुख करण्यात आलं आहे. अभिजित वंजारी हे नागपुरात इतिहास रचणारे आमदार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात. हा मतदारसंघ तयार झाला, तेव्हापासून भाजपच्या ताब्यात होता. अनेक वर्ष नितीन गडकरी या मतदार संघातून आमदार होते. त्यानंतर त्यांचा वारसा प्रा. अनिल सोले यांनी चालविला. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपमध्ये संवादाचे सूर जुळले नाहीत. गडकरी समर्थक प्रा. सोले यांना डावलण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा फटका भाजपला बसला. अभिजित वंजारी यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला. आता हे विधान परिषदेत ‘चीफ व्हिप’ पदावर आहेत.
आमदार अभिजित वंजारी हे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे समर्थक मानले जातात. नाना पटोले हे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांना सर्वाधिक पाठिंबा देणाऱ्या आमदारांपैकी वंजारी हे एक होते. विदर्भातील विशेषत: नागपुरातील अनेक आमदारांशी वंजारी यांचा ‘रॅपो’ चांगला आहे. वंजारी हे नाना समर्थक असले तरी ते त्यांना ‘ब्लाइंड फॉलो’ करीत नाहीत. काँग्रेस पक्षानं सोपविलेली जबाबदारी आजपर्यंत आमदार वंजारी यांनी चोखपणे बजावली आहे. त्यामुळं नानांचे समर्थक असल्याचा कोणताही परिणाम त्यांना ‘चीफ व्हिप’ करताना झालेला दिसत नाही. त्यामुळं वंजारी हे व्यक्ती पूजक नव्हे तर पक्षनिष्ठ असल्याचं काँग्रेसनंच या नियुक्तीवरून दाखवून दिल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे.
