महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : अजित पवार गुन्हेगारी टोळीचे आका

Ajit Pawar : हर्षवर्धन सपकाळांनी केली गंभीर विधानांची मालिका

Author

भाजप महायुती सरकारच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने गुन्हेगारी वाढत आहे. हे सरकार गुन्हेगारांचे रक्षण करत आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिंदे-भाजप सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की राज्यात सध्या चाललेली गुन्हेगारी ही सत्ताधाऱ्यांच्या पाठबळामुळेच फोफावली आहे.

राज्यात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) संबंधित आरोपींचा सहभाग सतत समोर येत आहे. बीड, पुणे, नागपूर, ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषण, हुंड्यासाठी छळ, कोयता गँग यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपी हे या पक्षाशी संबंधित आहेत, असे नमूद करत सपकाळ यांनी अजित पवार हे या गुन्हेगारी टोळीचे प्रमुख असल्याचे म्हटले.

आयोगावर निष्क्रीयतेचे आरोप

सपकाळ यांनी राज्य महिला आयोगालाही खडे बोल सुनावले. वैष्णवी हगवणे प्रकरणात वेळेवर हस्तक्षेप केला असता, तर तीचा जीव वाचू शकला असता. मात्र, आयोगाच्या अध्यक्षा महिलांच्या सुरक्षेऐवजी राजकीय चमकदारपणाकडेच अधिक लक्ष देत असल्याचे ते म्हणाले. यामुळेच राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.

सपकाळ यांनी धुळे येथील अंदाज समिती दौऱ्यात उघडकीस आलेल्या पैशांच्या प्रकरणावरही भाष्य केले. अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीत दोन कोटींची रक्कम सापडली आहे. हे या सरकारच्या लुटमारीचे थेट उदाहरण असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. धुळेतील कंत्राटदारांकडून ही रक्कम वसूल केल्याची माहिती आहे. ती लुट राजकारणाच्या मांडवात लपवली जात आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घ्यावी. खोतकर व त्यांच्या पीएला तात्काळ अटक व्हावी, अशी त्यांची मागणी होती.

सरकारचा दुर्लक्षाचा दाह

राज्यातील महायुती सरकारमधील आमदार हे भ्रष्टाचारात गळेपडू लागले आहे. त्यांच्यावर ईडी, लाचलुचपत विभाग व इन्कमटॅक्स विभागाने चौकशी करावी, असे सपकाळ यांनी ठणकावले. लुटीचे राज्य सुरू असून, जनतेच्या पैशांचा उधळपट्टीचा बाजार मांडण्यात आला आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची दखलही सपकाळ यांनी घेतली. हजारो हेक्टरीवरचे पिके व फळबागांचे नुकसान झाले असूनही सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. बोगस बियाणे व खतांच्या विक्रीमुळे शेतकरी भरडला जात आहे. सरकारने तत्काळ या बोगस विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सपकाळ यांच्या आरोपांमुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण मिळत आहे, अशी जनतेत भावना निर्माण झाली आहे. भाजप-शिंदे-अजित पवार गटाचे सरकार गुन्हेगारी, भ्रष्टाचार व राजकीय गुंडगिरीवर उभे असल्याचे सडेतोड मत हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!