काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर, हर्षवर्धन सपकाळ सातत्याने पक्ष बांधणीच्या कामात सक्रिय झाले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची मजबुती आणि संघटनात्मक बांधणी यावर विशेष भर दिला आहे.
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बैठका, भेटीगाठी आणि रणनीती आखण्यात रात्रंदिवस मग्न आहेत. अशा या धामधुमीत काँग्रेस पक्षानेही आपली कंबर कसली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पूर्व विदर्भात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गडात, म्हणजेच पूर्व विदर्भात, सपकाळ यांनी आपल्या तडफदार नेतृत्वाने नव्या नियुक्त्यांचा धडाका लावला आहे.
तुमसर विधानसभा मतदारसंघात सरचिटणीस कुंदा राऊत यांना विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. तर भंडारा जिल्ह्यात शकुर नागाणी यांना आणि साकोली विधानसभा मतदारसंघात प्रसन्न उर्फ राजा तिडके यांना विधानसभा प्रभारी ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पूर्व विदर्भ हा नाना पटोले यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. साकोली हा त्यांचा मतदारसंघ असल्याने या भागात त्यांचा दबदबा आहे. आता हर्षवर्धन सपकाळ यांनी या गडात आपल्या रणनीतीचा झेंडा रोवत पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पक्ष पुनर्बांधणीचा ध्यास
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सपकाळ यांनी पायाला भिंगरी लावली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत, कार्यकर्त्यांशी संवाद साधत, बैठका घेत आणि प्रत्येक बारीकसारीक बाबींचा आढावा घेत ते पक्षाच्या पुनर्बांधणीला गती देत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हा कार्यकारणीतही मोठे बदल घडवले आहेत. पूर्व विदर्भात नाना पटोलेंच्या गडात केलेले हे बदल पक्षाच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग मानले जात आहेत. राज्यात लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी पक्षाच्या मुळाशी जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचा संकल्प केला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयशाचा सामना करावा लागला होता. ही चूक पुन्हा होऊ नये, यासाठी सपकाळ यांनी आता कसून तयारी सुरू केली आहे. सपकाळ यांनी कार्यकर्त्यांच्या मनात नवीन ऊर्जा भरण्याचा संकल्प घेतला आहे. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पक्षाच्या स्थानिक पातळीवरील रचनेला बळकटी देण्यास सुरुवात केली आहे. पूर्व विदर्भात केलेल्या या नियुक्त्या हा त्याच रणनीतीचा भाग आहे. या भागात सपकाळ यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिका निवडणुकीच्या या रणसंग्रामात काँग्रेसला यश मिळवायचे असेल, तर स्थानिक नेत्यांचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचा जोश महत्त्वाचा आहे.