‘व्हॅलेंटाइन्स डे’ पेक्षाही त्याची पूर्वसंध्या खूपच महत्वाची असते. प्रेम करणारे लोक ते कसं व्यक्त करायचं याचं ‘प्लॅनिंग’ करीत असतात. मात्र बरेचदा एकतर्फी प्रेम करणाऱ्यांच्या भावना एका क्षणात चकनाचूर होतात. त्याला कारणंही तसंच असतं. ऐन प्रेम दिनाच्या दिवशी त्यांना ‘अरे वुई आर जस्ट फ्रेन्ड्स’ असं ऐकावं लागतं. असंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये प्रेम दिनाच्या पूर्वसंध्येला निर्माण झालं.
नरेंद्र मोदी यांचा स्वभाव न आवडल्यानं भाजपशी ‘डिव्होर्स’ घेऊन नाना पटोले हे काँग्रेसमध्ये आलेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या आयुष्यात आलेल्या या नव्या प्रेमामुळं राहुल गांधीही भरपूर ‘इम्प्रेस’ झालेत. पटोले यांनी राहुल गांधी यांना भूरळ पडावी असं केलंही होतं. चक्क मोदींशी त्यांनी पंगा घेतला होता. खासदारकीचा राजीनामा भाजपच्या तोंडावर फेकला होता.
नानांची ही ‘मॅचो मॅन इमेज’ राहुल गांधी यांना चांगलीच भावली. त्यामुळं राहुल यांनीही अगदी ‘दिल खोल के’ नानांना दिलं. त्यांना किसान आघाडी अन् त्यानंतर थेट महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षच केलं. कालांतरानं नाना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षही झालेत. पण का कुणास ठाऊस नाना विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीसोबत जास्त दिवस ‘रिलेशनशिप’मध्ये राहु शकले नाही. त्यांनी अध्यक्ष पदाशी अचानकच ‘ब्रेकअप’ केलं. एखाद्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. त्यासाठी प्रसंगी चंद्र, तारे तोडून आणण्याची ताकदही आपण स्वत:त निर्माण करतो. अगदी तशीच ताकद नानांनी लोकसभा निवडणुकीत दाखविली.
सपकाळ, वडेट्टीवारांवर Congress कडून प्रेम कायम; नानांसोबत ब्रेकअप
मोहब्बत की दुकान
देशवासियांचं मन अन् प्रेम जिंकण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘मोहब्बत की दुकान’ सुरू केली. भर लोकसभेत राहुल यांनी नरेंद्र मोदी यांना ‘हग’ केलं. राहुल यांच्या याच ‘मोहब्बत की दुकान’चे मुख्य ‘डिस्ट्रिब्युटर’च महाराष्ट्रात नाना बनले. पण म्हणतात ना ‘दो प्यार करने वालो के दुश्मन जमाना होता है’, तसंच नानांच्या बाबतीत झालं. काँग्रेससोबत त्यांचं प्रेम फुलत असतानाच अनेकांनी नानांच्या विरोधात आघाडी उघडली. लोकसभा निवडणुकीपूर्वी नानांना काँग्रेसमधून बराच विरोध झाला. पण नानांनी मनात ‘होगी प्यार की जीत’ हा विश्वास कायम ठेवला होता. सगळ्या विरोधकांना ‘दो गज जमिनी के नीचे’ पोहोचवून नाना राहुल गांधी यांच्या गळ्यातील ताईत बनले.
एखाद्या मुलाच्या प्रेमात पडलेल्या युवतीला तिचे घरचे बरेच समजावतात. ती प्रेमात पडलेला मुलाचे किस्से, कारनामे शोधून शोधून ते त्या मुलीसमोर आणत असतात. अगदी तशाच पद्धतीनं काँग्रेसमधील अनेकांनी नानांबद्दल राहुल गांधी यांचे कान भरण्यात कोणतीच कसर सोडली नाही. पण राहुल गांधी यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. राहुल गांधी यांना पटोले यांच्या बाबतीत खात्री होती. त्यामुळं राहुल यांनी लोकसभा निवडणुकीत नानांनाच महाराष्ट्राचं सर्वेसर्वा केलं. लोकसभा निवडणुकीत काँगेसनं महाराष्ट्रात बाजी मारली. त्यामुळं नाना काँग्रेसचे ‘स्टुडंट ऑफ इ इयर’ ठरले. विशेष म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गडात मोठा सुरूंग लावला.
Hon'ble Congress President Shri @kharge has appointed Shri @harshsapkal as the President of the Maharashtra Pradesh Congress Committee with immediate effect.
He has also approved the appointment of Shri @VijayWadettiwar as the Leader of the Congress Legislative Party in… pic.twitter.com/l3jiU6PQ8h
— Congress (@INCIndia) February 13, 2025
ब्लॅक फ्रायडे
नानांनी लावलेल्या या सुरुंगामुळं 4 जून 2024 हा मंगळवार भाजपसाठी ‘अमंगलकारी’ अन् काँग्रेससाठी ‘अमंगलहारी’ ठरला. लोकसभा निवडणुकीत यश मिळताच नानांचं बळ शंभर हत्तींचं झालं. नानांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं. बस विधानसभा निवडणुकीची काय ती प्रतीक्षा होती. निवडणूक होणार. महाविकास आघाडीचं सरकार येणार. नाना पटोले मुख्यमंत्री होणार असंच काय ते महाराष्ट्रात चित्र होतं. पण जागा वाटपाच्या बैठकीत महाविकास आघाडीमधील ‘आशिकी’ मध्ये खट्टास आली. शिवसेनेनं नानांची हायकमांडकडं तक्रार केली.
जास्तीत जास्त जागा काँग्रेसला मिळाव्या असा जोर होता असं नानांनी त्यावेळी सांगितलं. अर्थातच निवडणुकीत यश मिळालं असतं काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष झाला असता. अशात नानाच मुख्यमंत्री झाले असते. आता मुख्यमंत्र्याची खुर्ची म्हटल्यानंतर कोणालाही ‘कुछ कुछ होता है..’ होईल. तसं नानांनाही झालं. पण जागा वाटप करताना नानांनी घोळ केला असा आरोप वाढू लागला. विधानसभा निवडणूक झाली. निकाल आले अन् महाविकास आघाडी दनकण जमिनीवर आपटली. नानांचे ‘सपने चूर चूर’ झालेत. सगळ्यात मोठा धक्का बसला तो शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना. महाराष्ट्रानं असं कसं केलं असा प्रश्नच त्यांनी जाहीरपणे विचारला. या सगळ्याचं खापर सहाजिकच फुटलं ते नानांवर. विजय वडेट्टीवार यांनी तर स्पष्टच सांगून टाकलं. ज्याचं शेंगा खाल्ल्या, त्यानं टरफलं उचलावी, असा वडेट्टीवार यांना रोख होता.
आता दिली आहुती
विधानसभा निवडणुक काँग्रेस युद्ध हरली. दुर्दैवानं या युद्धामध्ये काँग्रेसनं नाना पटोले यांना ‘पद्मावती’ प्रमाणनं ‘जौहार’ करायला लावलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद दिलं बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांना. विधिमंडळ पक्षनेते पद दिलं विजय वडेट्टीवार यांना. नाना पटोले यांची आहुती मात्र काँग्रेस हायकमांडनं ‘अ थर्सड’च्या दिवशी दिली. त्यामुळं नाना आणि त्यांचे चाहते सध्या ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोडा..’ असा विचार मनात करू लागले आहेत. काँग्रेसनं ऐन ‘व्हॅलेटाइन्स’च्या पूर्व संध्येला सपकाळ आणि वडेट्टीवार यांच्या हाती ‘रेड’ तर नानांच्या हाती ‘ब्लॅक’ रोज दिला आहे.