महाराष्ट्र

Akola Politics : भाजपचा किल्ला हादरवणारे ‘अभय’ काँग्रेसच्या नजरेआड

Abhay Patil : विश्वासात न घेतल्याने पक्षाला दिली सोडचिट्टी

Author

भाजपचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या अकोल्यात काँग्रेससाठी आशेचा किरण ठरलेले डॉ. अभय पाटील यांनाच कार्यकारिणीतून डावलल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पाटील यांनी थेट पक्षत्याग करत राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे.

अकोला जिल्हा ज्याला भाजपचा अभेद्य किल्ला मानले जाते. या गडात काँग्रेससाठी विजयाची शक्यता निर्माण करणाऱ्या डॉ. अभय पाटील यांनाच काँग्रेसने आता दुर्लक्षित केल्याने मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. अकोल्यात काँग्रेसला दमदार संजीवनी देणाऱ्या या नेत्यालाच नव्या जिल्हा कार्यकारिणीत स्थान न देण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, काँग्रेस केवळ निवडणूक आल्या की मामा बनवते, बाकी वेळेस विसरते. म्हणजेच ‘कामापुरता मामा’ बनवते आणि बाजूला करते. अशा वागणुकीमुळेच अखेर निष्ठावान काँग्रेस नेता, माजी प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असे बोलले जात आहे. अभय पाटील यांनीही स्पष्टपणे सांगितले की, पक्षाने आपल्याला विश्वासात न घेतल्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

Akola : विकास कामं भाजपाचे, चमकोगिरीचे पोस्टर पठाण यांचे

हात दिला, पण पाठिंबा नाही

2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. पाटील यांनी तब्बल चार लाख 16 हजार 404 मते मिळवत काँग्रेससाठी मजबूत लढत दिली, अकोल्यातील भाजपचा गड हादरवला. मात्र विजय भाजपकडेच राहिला. तरीही पाटील यांनी निष्ठा न मोडता पक्षासाठी झिजणं सुरूच ठेवलं. पण जेव्हा अकोला जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी जाहीर झाली, तेव्हा त्यांचं नाव त्या यादीत आलं नाही. ना सल्ला, ना संपर्क.

नानापटोले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सरचिटणीस पद भूषवले होते. पण हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या नव्या यादीत पाटील यांना थेट डावलण्यात आलं. डॉ. अभय पाटील यांचा हा निर्णय केवळ काँग्रेससाठीच नाही, तर संपूर्ण विदर्भातील असंतुष्ट काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक संदेश आहे की, अस्मितेवर गदा आली, की निष्ठा विसरावी लागते.

पुढचं पाऊल कुठं?

राजकीय संन्यासाची घोषणा त्यांनी केली असली, तरी अकोल्यातील राजकीय फलकावर इतक्या सहजतेने अभय पाटील नामशेष होतील, असं कोणीही मानत नाही. अनेक पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत, तर काहींनी आधीच ऑफरही दिल्याची चर्चा आहे. विशेषतः आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पाटील यांचा निर्णय कोणत्या पक्षाला लाभ देतो आणि कोणाला घायाळ करतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!