राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम राहावी अशी अनेकांची इच्छा आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.
आगामी काळात होणारी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेनं केली आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी विधान केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. आता यासंदर्भात काँग्रेसकडून नवीन प्रस्ताव पुढं आला आहे. महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढण्यास काँग्रेस तयार असल्याचं ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मात्र, तरी देखील आम्ही उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांना एकत्र येण्याची विनंती करणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे. केंद्रात इंडिया आघाडीही कणखर आहे, असं ते म्हणाले. त्यामुळं काँग्रेसची एकत्र लढण्याची इच्छा दिसत असल्याचं बोललं जात आहे.
लवकरच ठरणार Future
महाविकास आघाडीचं भवितव्य आता शिवसेनेच्या हातात आहे. शिवसेना आघाडीतून बाहेर पडल्यास आघाडीत केवळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहिल. मात्र ही आघाडी तुटू नये, असं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे. दुसरीकडं शिवसेना सातत्यानं स्वबळाचा दावा करीत आहे. इंडिया आघाडी तुटण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. मात्र इंडिया आघाडी मजबूत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. या सगळ्यात त्यांनी शिवसेनेसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलो. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील एकत्रीत लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं.
संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केली असली तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. उद्धव ठाकरे यांना एकत्र लढवण्याची आम्ही विनंती करणार असल्याची माहिती देखील वडेट्टीवार यांनी दिली. राज्यातील 29 महापालिकेची निवडणूक सध्या प्रलंबित आहे. या सर्व महापालिकांमध्ये प्रशासक राज आहे. लवकरच निवडणूक होणार आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं वडेट्टीवार म्हणाले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. शिवसेनाही सोबत असावी, असंही वडेट्टीवार म्हणाले. आपण याबाबत ठाकरेंना विनंती करु. शिवसेना सोबत येणार नसेल तर काँग्रेसचा मार्ग मोकळा असेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची नैसर्गिक आघाडी कायमस्वरूपी राहिली. उद्धव ठाकरे यांनी ऐकलेच नाही, तर दोन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जातील. महापालिका निवडणुकीत यश आघाडीलाच मिळेल, असंही वडेट्टीवार म्हणाले. सध्या काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार फ्रंटफूटवर आल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर फोडलं आहे.
