अकोला आणि खामगावच्या राजकारणात प्रचंड खळबळ. काँग्रेसचा पंजा सुटून आता घड्याळाच्या दिशेने दोन्ही दिग्गज नेत्यांची वळवळ सुरू झाली आहे. पक्षांतराने सत्तासमीकरणांमध्ये होणार नवा स्फोट.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर अकोला आणि खामगावच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झालाय. काँग्रेसच्या गडगडाटात राष्ट्रवादी काँग्रेसनं ‘मास्टरस्ट्रोक’ टाकत दोन मातब्बर नेते आपल्यामध्ये सामावलेत. अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड आणि खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा आता ‘दादांच्या’ म्हणजेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.
राजकीय वर्तुळात याचं वर्णन केलं जातंय कॉंग्रेसच्या वटवृक्षातून गळणाऱ्या पानांचं राष्ट्रवादीच्या बगिच्यात फुलणं म्हणून. 12 जून हा दिवस अकोल्यातील आणि खामगावातील सत्तासमीकरणांसाठी निर्णायक ठरणार आहे. या दिवशी अजित पवारांचा अकोला आणि खामगाव दौरा ठरलेला असून, त्यांच्या उपस्थितीत हे दोघेही मोठे चेहरे पक्षप्रवेश करणार आहेत.
समीकरणं उलथवणार
अकोल्यात 2007 मध्ये भाजपला धूळ चारत महापौर झालेल्या मदन भरगड यांचा जनसंपर्क अफाट आहे. मदन भरगड यांनी विधानसभा निवडणूक देखील लढविली होती, परंतु त्यांचा पराभव झाला. काँग्रेसमधील भरगड यांनी आता राष्ट्रवादीचा हात धरला आहे. तर खामगावमध्ये दिलीप सानंदा यांचा प्रवेश राजकीय समीकरणं एकदम उलथवणार आहे. खामगावात अक्षरश: सानंदा आणि पवार यांचे बॅनर लागले आहेत. सत्ताधारी गोटात अस्वस्थतेची झळ पसरली आहे. सध्या जिथं भाजप व शिंदे गटाचं वर्चस्व आहे. तिथं सानंदा सारखा खेळाडू राष्ट्रवादीकडं वळल्याने मोठा हलकल्लोळ झालाय.
खामगाव जळगाव-जामोद मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार संजय कुटे, कामगारमंत्री आकाश फुंडकर आणि आता राष्ट्रवादीचे सानंदा हे त्रिकूट रंगणार आहे. सानंदा यांना आता या दोघांशी प्रत्यक्ष ताकद लावावी लागणार आहे. मात्र त्यांच्या नावाभोवती लोकभावना असल्यामुळे आगामी राजकारणात सखोल बदल अपेक्षित आहेत. आनंदा यांना फुंडकर आणि कुठे यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे. एकेकाळी विलासराव देशमुखांचे विश्वासू समजले जाणारे नेते दिलीप सानंदा आता काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीत येत आहेत. ही गोष्ट काँग्रेससाठी नक्कीच मोठी नामुष्कीची आहे. अकोल्यात काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आणि गोंधळलेल्या रणनीतीमुळे अनेक कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत.
Akola : शासकीय डोळ्यांत धुळ फेकत ‘प्रहार’चे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे
रंगमंचावर रंगणार ‘शो’
अकोल्यात भाजपमध्येही काही वरिष्ठ नेत्यांविरोधात उघडपणे नाराजी आहे. कार्यकर्ते तक्रारी मांडताना दिसत आहेत. तर शिंदे गटात तर इतकी खदखद आहे की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या संपर्कप्रमुखाचा पुतळा जाळण्यात आला. हे दाखवतं की सत्ताधाऱ्यांचंही नातं लोकांशी गढूळलंय. अकोला आणि खामगावच्या राजकीय रंगमंचावर आता जो ‘शो’ रंगणार आहे, त्यात प्रत्येकीचं सामर्थ्य, जुनी प्रतिष्ठा, आणि नव्या जोमाचा कस लागणार आहे. दादांनी फेकलेलं हे ‘राजकीय जादूगिरी कार्ड’ महापालिका निवडणुकीमध्ये सत्तेचा चेहराच पालटू शकतं.
या राजकीय रंगभूमीवर प्रत्येकाने आपली भूमिका ठरवली आहे. प्रवेश, बॅनर, आरोप, नाराजी, आणि रणनीतींचा हा खेळ जसा-जसा पुढे सरकेल, तसा ‘राजकीय थ्रिलर’ अजूनच रंगतदार होणार आहे. एक मात्र निश्चित की, अकोला आणि खामगावची ही निवडणूक तमाशा नाही, पण तमाम राजकीय मंडळींसाठी ‘फुल एंटरटेनमेंट’ नक्की आहे. राजकीय निष्ठा बदलण्याचं हे ‘प्रवेश पर्व’ आगामी निवडणुकीच्या धुमश्चक्रीची नांदी ठरणार आहे. आता अकोला-खामगावचा जनतेचा कौलच ठरवेल की दादांची ही रणनीती राजकीय “हिट” ठरते की “फ्लॉप”.
