नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं पळ काढला. अनेक प्रश्न सरकारनं टाळले. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला सोडणार नाही, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना दिला.
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार असल्याचा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना दिला. महायुतीचं सरकार राज्याला लुटत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा वाजला आहे. महिला असुरक्षित आहेत. केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जात आहे. लोकांच्या हत्या होत आहेत. सरकारचे मंत्री घोटाळेबाज निघत आहेत. सरकारकडून मनमानी सुरू आहे. पोलिस विभागाकडून आरोपींना व्हीआयपी सेवा दिली जात आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस सरकारला सळो की पळो करून सोडेल, असं नाना पटोले म्हणाले.
अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे, याची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व मुद्द्यांवर सरकारला जाब द्यावा लागणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं पळ काढला. कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार केला नव्हता. मंत्र्यांना अनेक दिवसांपर्यंत खातेवाटप करण्यात आलं नव्हतं. सरकार नवीन असल्याचा बहाणा करून अधिवेशन गुंडाळण्यात आलं. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही सरकारला पळू देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.
राज्याला लाज आणली
बीड आणि परभणीच्या घटनेमुळं महाराष्ट्र लाज वाटत आहे. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातही सरकारनं गंभीरता दाखविली नाही. सरकारचे मंत्री बेछूट काहीही बोलत आहे. धनंजय मुंडे यांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करीत आहेत. पुण्याच्या मुद्द्यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंलं विधान बेताल आहे. या सर्व मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील नाना पटोले यांनी केली.
महायुती सरकारनं हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा विषय चिघळविला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नंबर प्लेटची किंमत सगळ्यात जास्त आहे. यातून सामान्यांची आर्थिक लूट करण्यात येत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. सामान्य जनतेला महायुतीनं निवडणुकीपूर्वी अनेक वचनं दिली होती. त्यापैकी एकही वचन पूर्ण झालेलं नाही. लाडक्या बहिणींची फसवणूक सरकानं केल्याचा आरोपही पटोले यांनी केला. आता सरकारला या सर्व मुद्द्यांवर जाब मागणार आहोत. यापैकी काही मुद्द्यावर यंदाच्या अधिवेशनात सरकारला किंवा मंत्र्यांना पळ काढू देणार नाही, असंही पटोले म्हणाले.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन थातुरमातुर उत्तरं दिली. बरंच काही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु आजही बीड, परभणीच्या मुद्द्यावर काहीही झाल्याचं दिसत नाही. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातील घोषणा या फोल ठरल्याची टीकाही आमदार नाना पटोले यांनी केली.