
नागपूरमध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचारानंतर अनेक पीडित कुटुंबांची घरं पाडण्यात आली आहेत. या अन्यायग्रस्त कुटुंबांना नव्याने घरं बांधून द्यावीत, अशी मागणी काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केली आहे.
नागपूरमध्ये काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या धार्मिक हिंसाचाराने नागपूरचे वातावरण अशांत झाले होते. हिंदू मुस्लिम वाद चिघळल्याने नागपूरसह विदर्भातही तणाव निर्माण झाले होते. या घटनेनंतर शहरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसकडून शांती यात्रा काढण्यात आली. या दौऱ्यादरम्यान काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरच्या रस्त्यांवरून सद्भावना शांती मार्चचं नेतृत्व केलं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हिंसाचार रोखण्यासाठी पुढे आलेल्या लोकांचीच घरं सरकारने पाडली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. हा शांती मार्च 16 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला. राज्यात सौहार्द निर्माण करण्याच्या उद्देशाने काँग्रेसकडून हा पाऊल उचलण्यात आलं. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेतेही या यात्रेत सहभागी झाले. पत्रकार परिषदेत बोलतांना राऊत म्हणाले, या पीडित कुटुंबांना सरकारने नवीन घरे बांधून द्यावीत. केवळ माफी मागून प्रश्न सुटणार नाही. राऊत यांनी स्पष्ट केलं की, नागपूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली.
Devendra Fadnavis : अनुदानाची पाऊसधार,शेतकऱ्यांना मिळणार नवा श्वास
शांती यात्रेवर विरोध
सरकारने अशा वेळी संतुलन राखून वागायला हवं होतं. पण इथे तर पोलिसांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून थेट घरं पाडायला सुरुवात केली. नागपूर महापालिका आयुक्तांनी न्यायालयात माफी मागितली खरी, पण एवढ्यावरच समाधान मानता येणार नाही. राऊत यांनी यावेळी नागपूर शहराच्या वैशिष्ट्यांची आठवण करून दिली. ताजबाग आणि दीक्षाभूमीसारख्या ठिकाणांमुळे नागपूर शांतताप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं. पण काहींनी रमजान आणि राम नवमीच्या काळात मुद्दामहून धार्मिक तेढ निर्माण केली, असा आरोप त्यांनी केला.
रामाचे नाव घेणारे लोक विसरले की, त्याच रामाने शबरीच्या झाडावरच्या बोऱ्यांवर प्रेमाने ताव मारला होता. मात्र आज काहीजण कुराणातील आयती लिहिलेलं कापड जाळत आहेत. आमच्या शांती यात्रेला विरोध करत आहेत, असंही राऊत म्हणाले. राजकीय आरोपांचं तडाखेबाज उत्तर देताना नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. राहुल गांधींचं नाव कुणीही मिटवू शकत नाही. ते आमच्या हृदयात कोरलेलं आहे. समुद्राच्या लाटांनी ते मिटणार नाही, असं भावनिक वक्तव्य त्यांनी केलं. ते पुढे म्हणाले, आज संविधानाची भाषा बोलणाऱ्यांना लक्ष्य केलं जातं.
Chandrashekhar Bawankule : बाळासाहेब असते तर लाथच घातली असती
पोलिसांनी जर आपली जबाबदारी पार पाडली असती, तर नागपूरमध्ये हिंसाचार घडलाच नसता. पण सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात कथित आरोपी फहीम खानचं घर पाडल्याच्या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. न्यायव्यवस्थेच्या आदेशांचं उल्लंघन झालं असून त्याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.