
राम भक्तीच्या उत्सवात नवा अध्याय. अकोल्यात यंदा श्रीराम नवमी शोभायात्रेला वेगळा राजकीय रंग चढला आहे. हिंदू संस्कृतीच्या या भव्य उत्सवात यावेळी साजिद खान पठाण शोभायात्रेचे स्वागत करणार आहेत. त्यामुळे रामभक्तांचं हे पारंपरिक पर्व, साजिरं होत असतानाच शहरात चर्चांचा गदारोळही सुरू झाला आहे.
विदर्भाच्या हृदयस्थानी असलेल्या अकोल्यात श्रीराम नवमीचा सण म्हणजे उत्सवाची जणू पर्वणीच. संपूर्ण शहरात रामभक्तांचा जल्लोष, सजवलेल्या रथांची मिरवणूक, भगव्या झेंड्यांनी नटलेले रस्ते आणि ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी दुमदुमलेले वातावरण अनुभवायला मिळतं. श्रीराम नवमी निमित्त दरवर्षी अकोल्यात भव्य शोभायात्रा काढण्यात येते. ज्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचं दृश्यरूप सादर केलं जातं. या शोभायात्रेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. पण यंदाची श्रीराम नवमी काहीशी वेगळी ठरत आहे, कारण या वर्षी शोभायात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेसही पुढे सरसावली आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे मुस्लिम आमदार साजिद खान पठाण हे स्वतः शोभायात्रेचं स्वागत करणार आहेत. त्यामुळे सर्वच स्तरांमध्ये आश्चर्याची आणि चर्चेची लाट उसळली आहे. मागील अनेक वर्षांपासून अकोल्यात भाजपची मजबूत पकड होती. मात्र 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला अकोला पश्चिम मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी विजय मिळवत भाजपचा गड म्हणवला जाणारा हा मतदारसंघ काँग्रेसकडे आणला.

चर्चेचा विषय
भाजपचा आमदार नसतानाही, यंदाही नेहमीप्रमाणे भाजपकडून रामनवमी शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. मात्र यंदा प्रथमच अकोल्यात एक मुस्लिम आमदार साजिद खान पठाण शोभायात्रेचं स्वागत करत आहेत, आणि हाच मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी भाजपने साजिद पठाण यांच्यावर अकोल्यातील काही हिंसक घटनेत सहभागी असल्याचा आरोप केला होता. काही महिन्यांपूर्वी अकोल्यात झालेल्या दंगलीमागेही त्यांचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
नागपुरातील महाल भागात नुकत्याच घडलेल्या दंगलीनंतर काँग्रेसने पाठवलेल्या सत्यशोधन समितीतही साजिद पठाण यांचं नाव होतं. यावर भाजपने प्रखर टीकाही केली होती. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर साजिद खान पठाण हे श्रीराम नवमी शोभायात्रेच्या स्वागतासाठी पुढे सरसावले आहेत, हे अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरत आहे.
राजकीय सलोखा
साजिद खान यांच्याकडून हिंदू धर्माच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या श्रीराम नवमी शोभायात्रेचं स्वागत होणं, हे सर्वांना आश्चर्यजनक वाटत आहे. अनेक लोक याला त्यांचे कारण म्हणत आहेत. अकोल्यात श्रीराम नवमीचा सण म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आता राजकीय रंगही घेऊन येणारा उत्सव बनला आहे.
काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी स्वागताची जबाबदारी घेतल्याने यंदाची शोभायात्रा अधिक लक्षवेधी ठरणार, हे निश्चित. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन सर्वधर्मसमभावाचा संदेश या निमित्ताने मिळणार, असे काँग्रेसकडून म्हटले जात आहे. परंतु साजिद खान पठाण यांचं हे नवीन राजकारण असल्याचे अनेक नागरिकांमधून म्हटल्या जात आहे. यामुळे अकोल्यातील या बदलत्या राजकारणाचा परिणाम भविष्यात कसा होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.