महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : संविधानाच्या कोडमध्ये मनुवादी व्हायरस 

Congress : सपकाळांच्या टीकेने पुन्हा पेटली राजकीय भट्टी

Post View : 41

Author

संविधानातील मूलतत्त्वं बदलून मनुस्मृती लादण्याचा संघाचा अजेंडा उघड होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सेक्युलर-सोशालिस्ट शब्द हटवण्याची मागणी ही त्याच कटाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढविण्यासाठी काँग्रेस एकही संधी सोडत नाही. आता काँग्रेसने पुन्हा भाजप आणि संघावर हल्लाबोल केला आहे. भारतीय संविधान बदलण्याच्या गुप्त अजेंड्याचे गूढ आता उघडउघड चर्चेत येऊ लागले आहे. ‘हिंदू राष्ट्र’ या उद्दिष्टाने झपाटलेल्या शक्तींचा संविधानावर असलेला रोष आता फक्त इतिहासात किंवा संशयाच्या धुक्यात राहिलेला नाही, तो सरळ सरळ वाचता येईल अशा विधानांमधून प्रकट होतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांचे “सेक्युलर व सोशालिस्ट” हे शब्द संविधानातून हटवण्याचे वक्तव्य हे त्याच एका दूरगामी आणि धोकादायक कटाचा भाग असल्याचे खळबळजनक विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

संविधान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, तो विचारच संघाला मान्य नाही, असे म्हणत सपकाळ यांनी भाजप व संघावर थेट घणाघात केला. मनुस्मृती हेच त्यांचे अंतिम तत्त्वज्ञान असून, त्याचाच अप्रत्यक्ष व धीम्या गतीने आग्रह लादला जातोय, असा आरोपही त्यांनी केला. 2014 पासून सुरु झालेला ‘राजकीय प्रयोग’ आता सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वळवण्यात येतोय आणि त्या वाटचालीचा मुख्य बळी ठरतोय भारतीय संविधान, अशी स्पष्ट भूमिका सपकाळ यांनी मांडली.

Yavatmal Municipal Council : हायमास्ट प्रकल्पात भ्रष्टाचाराचा हाय व्होल्टेज शॉक

संविधानाचा लढा

संघाचे ज्येष्ठ नेते होसबळे यांनी नुकतेच दिलेले विधान, संविधानाच्या उद्देशिकेतील ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ हे शब्द काढावेत, यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र सपकाळ यांच्या मते, ही केवळ चूक की चूक नसलेली चूक? या प्रश्नाच्या पुढे जाऊन हेच संघाचे आणि भाजपचे ‘डिजायन’ आहे. 400 जागा आल्या तर संविधान बदलू, हे भाजप नेत्यांचे विधान. संविधानाची समीक्षा झाली पाहिजे, हे मोहन भागवतांचे भाष्य आणि संविधान बदलण्याची गरज आहे, असे सांगणारे पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय, हे सगळे वेगवेगळे सूर नाहीत. एकाच रागातील तुकडे आहेत, असा आरोप सपकाळ यांनी लावला.

संतप्त सवाल

सात महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ विचार संविधानाच्या मूलतत्त्वांचा भाग आहेत. तरीही संघ आणि भाजपकडून वारंवार या तत्त्वांना डावलले जाते, असा संतप्त सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, धर्मनिरपेक्षता म्हणजे फक्त एका धर्माला विरोध नव्हे; ती म्हणजे सगळ्यांवर सारखाच अधिकार आणि आदर. पण हेच मूल्य भाजप व संघाच्या डोळ्यात खुपते. म्हणूनच त्यांचा खरा अजेंडा आहे , ‘हिंदू, हिंदी आणि हिंदूराष्ट्र’.

Harshwardhan Sapkal : उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे पण घोषणाबाजी गुजरातची

हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट इशारे देत म्हणाले की, ही लढाई फक्त शब्दांपुरती नाही, ही आपल्याला मिळालेल्या हक्कांची आणि ओळखीची लढाई आहे. तिरंगा, संविधान आणि लोकशाही यांच्यावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने आता सावध राहावे. सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याचा शेवट अत्यंत आवाहनात्मक आणि विचारप्रवर्तक शब्दांत केला. ते म्हणाले, ही लढाई मतांची नाही, ही लढाई मनांची आहे. संविधान बदलण्याचा हा अजेंडा उघड झाला आहे. लोकशाही अबाधित ठेवायची असेल, तर संविधानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आता एकवटले पाहिजे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!