रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याशी साधर्म्य राखणारी टीका केली आहे.
राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आता धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. धंगेकर यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही धंगेकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा पाठवताना भावूक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. मी गेल्या 10 – 12 वर्षांपासून काँग्रेससोबत कार्यरत आहे. पक्षाशी माझे जिव्हाळ्याचे नाते जुळले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे माझ्या कुटुंबाचा एक भाग झाले आहेत. त्यांनी मला नेहमीच साथ दिली, माझ्यावर प्रेम केले. गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या. त्यामध्ये पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्या मागे ठामपणे उभे राहून मला बळ दिले. जरी मी निवडणुकीत पराभूत झालो, तरीही त्यांनी माझ्यासाठी झटून मेहनत घेतली. त्यामुळे आज पक्ष सोडताना मन हेलावून गेले आहे. धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भगव्या उपरण्यासहचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला होता. त्यानंतर त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्या चर्चांना सत्यात उतरवले आहे.
दुर्दैवी त्याग
धंगेकर यांच्या या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू,” असे म्हणत त्यांनी धंगेकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सपकाळ पुढे म्हणाले, धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या संपर्कात नव्हते. आम्ही अनेकदा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आज त्यांच्या निर्णयावर आश्चर्य वाटत नाही, कारण हा भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या राजकारणाचा बळी आहे. शिवसेनेने त्यांना काहीतरी आश्वासन दिले असेल, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, मात्र त्यांनी काँग्रेसचा त्याग करणे दुर्दैवी आहे, असे सपकाळ म्हणाले.
विशेष म्हणजे, सपकाळ यांनी केलेली ही टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेशी साधर्म्य राखणारी आहे. सपकाळ यांनी केलेली ही टीका देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यांची आठवण आणून देणारी आहे. काही वर्षांपूर्वी फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत “कोण होतास तू, काय झालास तू” असे शब्द वापरले होते. आता हर्षवर्धन सपकाळ यांनीही धंगेकरांवर हीच टीका केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
सरकारने फसवले
नुकत्याच सादर झालेल्या महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली. हे सरकार स्वतःला ट्रिपल इंजिन सरकार म्हणवून घेतं, पण त्यांनी महाराष्ट्राला फसवलं आहे. शेतकरी, महिला आणि तरुणांना दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या, मात्र अर्थसंकल्पात कोणत्याही ठोस तरतुदी नाहीत. हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ गाजर दाखवण्याचा प्रकार आहे.