पंढरपूरच्या वारीत सहभागी होत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बळीराजा, बेरोजगार आणि महिलांवरील अन्यायासाठी पांडुरंग चरणी साकडं घातलं. वारीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा आणि न्यायाचा मंत्र दिला.
राजकारणाच्या कोरड्या मातीतून भावनेचा अंकुर फुटला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले. यावेळी विठ्ठलाच्या चरणी भावपूर्ण साकडं घालत म्हणाले, ‘बळीराजाला चांगले दिवस येवोत, बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिलांवरील अत्याचारांचे काळे ढग दूर होऊ दे.
राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. पावसाच्या लहरीने शेतातील पिकं वाया गेली आहेत, बाजारात भाव नाहीत, आणि सरकारची वचनं केवळ घोषणांपुरती मर्यादित राहिली आहेत. अशा परिस्थितीत, पंढरपूरच्या वारीत सहभागी होत सपकाळ यांनी बळीराजाच्या वेदनांना आवाज दिला. त्यांच्या या साकड्यामध्ये नुसती श्रद्धा नव्हे, तर सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही स्पष्ट होती.
Devendra Fadnavis : शक्तिपीठ महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी
पसायदानाचे उदाहरण
यवत गावातून निघालेल्या दिंडी क्रमांक 282 मध्ये सपकाळ यांनी स्वतःच्या सहकाऱ्यांसह सहभागी होत पायी चालत वरवंडपर्यंतचा प्रवास केला. सावळ्या विठ्ठलाचे नामस्मरण करत त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत सामाजिक समतेचा संदेश दिला. प्रार्थनेच्या सुरात बोलताना त्यांनी म्हटलं, विश्वात्मके देवे… दुरितांचे तिमिर जावो, हे जे आपण बोलतो ते फक्त वारीपुरते मर्यादित राहू नये. ते प्रत्येकाच्या जीवनात साकार होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक बांधिलकी लागते. शेतकरी, बेरोजगार, महिला, सर्वांचं कल्याण हेच आमचं राजकारण आहे.
सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितलं की वारकरी संप्रदाय हा केवळ भक्तीचा प्रवाह नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा झरा आहे. त्यात समता, बंधुता आणि न्यायाचे बीज आहे. “भारतीय स्वातंत्र्य चळवळीला याच संप्रदायाच्या विचारसरणीचा आधार होता आणि हेच विचार आपल्याला आजही संविधानात आढळतात, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. त्यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ या संकल्पनेचा पुनःस्मरण करत सांगितलं की, आज जर महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल, तर संतविचार, बहुजन सुखाय, आणि समाजवादाचे मूल्यमापन नव्याने करण्याची गरज आहे.
वारीत सहभाग हे केवळ एक धार्मिक कर्तव्य नव्हे, तर सामाजिक जागृतीचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या पवित्र वारीत सपकाळ यांच्यासोबत अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते सहभागी झाले होते. त्यात प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अजय छाजेड, गोपाल तिवारी, प्रकाश सोनावणे, अमर खानापुरे, श्रीरंग बर्गे आणि पृथ्वीराज पाटील यांचा समावेश होता.
वारीच्या पवित्र वाटेवर चालताना काँग्रेसच्या या ‘समतेच्या दिंडी’ने राज्यातील जनतेच्या मनात एक नवा आशावाद जागवला आहे की, पांडुरंगाच्या कृपेने आणि सजग नेतृत्वाच्या प्रयत्नाने बळीराजा, महिलावर्ग आणि तरुणांना न्याय मिळेल, आणि महाराष्ट्र पुन्हा समतेच्या मार्गावर ठामपणे उभा राहील.
