महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : जातीयवादाच्या विरोधात काँग्रेसचा सद्भावना सत्याग्रह 

Maharashtra : धर्माच्या नावावर फूट नको, विकासासाठी एकत्र या  

Author

न्याय, समतेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून जातीय तेढाविरोधात सद्भावना सत्याग्रह छेडण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान काँग्रेसने पुन्हा एकदा जनतेशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर आता महाराष्ट्रात सद्भावना सत्याग्रहाच्या माध्यमातून काँग्रेस जनतेच्या मनात असलेली अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सत्याग्रहाचं नेतृत्व करत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्याचं आवाहन केलं आहे.

पक्षाच्या मते, महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवून समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. या विरोधात आवाज उठवणं अत्यंत आवश्यक बनलं आहे. 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने घडवलेलं महाराष्ट्र राज्य सध्या विविध क्षेत्रांत देशात आघाडीवर आहे. शौर्य, बलिदान, समता आणि पुरोगामी विचारांची परंपरा असलेल्या या राज्याने अनेक संत, समाजसुधारक, योद्धे आणि विचारवंत घडवले. त्यांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभर पाहायला मिळतो, असं सपकाळ यांनी सांगितले.

Education Department : आरोग्याचा पाठशाळेत प्रवेश

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

उद्योग, शिक्षण, कृषी, सहकार आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशासाठी एक आदर्श ठेवला आहे. पण आजचे वास्तव अधिकच काळजी जनक आहे. राज्यात द्वेष पसरवण्याचे प्रयत्न सुरू असून, सरकार विकासाच्या मुद्द्यांपासून जनतेचं लक्ष हटवून फूट पाडण्याचे काम करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की जनता गंभीर समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण व आरोग्य व्यवस्था, वाढती बेरोजगारी, महागाई, महिलांची सुरक्षा, आणि तरुणांमध्ये वाढणारे ड्रग्सचं प्रमाण. पण सत्ताधाऱ्यांचं लक्ष या प्रश्नांकडे न लागता, समाजात भांडणं लावणाऱ्या प्रवृत्तींना प्रोत्साहन दिलं जात आहे.

सद्भावना सत्याग्रह ही केवळ राजकीय चाल नाही, तर सामाजिक ऐक्याचं आंदोलन असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. सरकारच्या फसव्या घोषणा, अपूर्ण वचनं, आणि कटकारस्थानांमुळे सामान्य नागरिकांच्या मुलभूत गरजा आजही पूर्ण होत नाहीत. काँग्रेसचा हा सत्याग्रह गांधीवादी मार्गाने लोकांपर्यंत पोहोचून, पुन्हा एकदा राज्यात सामाजिक एकतेचा उजेड पसरवण्याचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यलढ्यात जसा सत्याग्रह महत्वाचा ठरला, तसाच हा सत्याग्रहही महाराष्ट्राच्या भविष्याला आकार देणारा ठरेल, असं पक्षाचं मत आहे.

Pahalgam Attack : वादळ उठताच काँग्रेस नेत्यांना गप्प बसण्याचे आदेश 

उज्वल भविष्याचा निर्धार

हर्षवर्धन सपकाळ यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, आज जर आपण आवाज उठवला नाही, तर उद्या इतिहास आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे या सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि महाराष्ट्रातील सद्भावनेच्या मूल्यांना पुन्हा एकदा बळ द्या, असं सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र कधीच जातीयवादासमोर झुकलेला नाही. आजही तो झुकणार नाही, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. सद्भावना सत्याग्रह हा एक राजकीय मोहिम न राहता, राज्याच्या उज्ज्वल, समतावादी आणि प्रगतिपथावर चालणाऱ्या प्रवासाचा भाग ठरेल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!