
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संभाव्य युतीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, जे पक्ष काँग्रेसच्या मूल्यांना मान्यता देतील, त्यांच्यासोबतच काँग्रेस पुढे जाईल.
मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यात मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आल्याने राज्याच्या राजकारणात नवा रंग भरला गेला. त्रिभाषा सूत्र मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याने मराठी अस्मितेचा जल्लोष साजरा केला. मात्र, याच घटनेने संभाव्य युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात गती मिळवून दिली आहे. काँग्रेसकडून यावर पहिली अधिकृत प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली असून त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की, समविचारी पक्ष असतील आणि काँग्रेसच्या मूल्यांना मान्यता देतील, तरच काँग्रेस अशा युतीसोबत पुढे जाईल.
बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी राजकीय विश्लेषण मांडले. त्यांनी सांगितले की, विजयी मेळावा केवळ मराठी विषयाच्या अनुषंगाने साजरा करण्यात आला. त्यामुळे त्यावरून कोणतेही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, अशा एकत्र येण्याने राजकीय संभाव्यता स्पष्टपणे उभी आहे. काँग्रेस त्याबाबत पूर्ण भान ठेवूनच निर्णय घेईल, असा संकेत त्यांनी दिला.

महाविकास आघाडीची पार्श्वभूमी
सपकाळ यांनी महाविकास आघाडीच्या उदयाची पार्श्वभूमी मांडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात आधीपासूनच एकजूट होती. मात्र 2019 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने निर्णय घेतला. त्यानंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली. पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी या तिन्ही पक्षांनी एकत्रित रणनीती आखली. तथापि, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कोणतीही अधिकृत युती केली नव्हती. त्या स्तरावर समविचारी पक्षांशी स्थानिक नेतृत्वाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला.
आजच्या संदर्भात समविचारी पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित शक्ती. युतीसाठी व्यापक स्वरूपातील चर्चा आणि विचार होणार असून काँग्रेस केवळ आपल्या मूल्यांना मानणाऱ्यांनाच साथ देईल, असा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला. ही भूमिका आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्पष्ट दिशा निर्धारण करणारी आहे.
Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात येऊन उभा रहा, मग कळेल तुझ्या भोजपुरीची लायकी
मेळाव्याचा मर्यादित उद्देश
सपकाळ यांनी विजयी मेळाव्याचे स्वरूप स्पष्ट करत सांगितले की, हा मेळावा केवळ मराठी अस्मितेच्या संरक्षणासाठी होता. त्यात राजकीय युतीचे संदेश शोधणे चुकीचे ठरेल. निवडणुक केव्हा होतील यावर अजूनही अनिश्चितता आहे. कधी फेब्रुवारी, कधी ऑक्टोबर तर कधीच न होण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवणे हाच भाजपचा हेतू आहे, असा घणाघात त्यांनी केला. काँग्रेसने मराठी भाषेसाठी नेहमीच कटिबद्ध भूमिका घेतली आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला पक्ष काँग्रेसच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. विजयी मेळाव्यासाठी निमंत्रण मिळाले होते. मात्र आधीपासून ठरलेल्या कार्यक्रमामुळे उपस्थित राहता आले नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली, तर ती राज्यातील तिसऱ्या आघाडीचे चित्र उभे करू शकते. अशावेळी महाविकास आघाडीची घडी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
पुढील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस कोणासोबत हातमिळवणी करते, हे राज्याच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या दिशादर्शक भूमिकेचा पुनः एकदा पुनरुच्चार करत म्हटले आहे की, काँग्रेसची वाटचाल केवळ विचारसरणीच्या सुसंगतीच्या आधारावरच घडेल.