राज्यातील शिवभोजन केंद्र बंदीच्या संकटावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. जनतेच्या ताटातील अन्न काढून सत्ता उपसतेय सत्तेचा घास, असा घणाघाती आरोप करत त्यांनी सरकारला जबाबदार धरलं.
राज्य सरकारने गोरगरिबांच्या ताटातील अन्नच हिरावलंय, अशा शब्दांत माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, राज्यभरात सुरू असलेल्या एक हजार 900 शिवभोजन केंद्रांपैकी बहुतेक केंद्रे आता बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आली आहेत आणि हे सगळं नियोजनशून्य कारभाराचा परिणाम आहे.
ठाकूर म्हणाल्या, शिवभोजन ही योजना गरिबांच्या ताटातील सन्मान होती. अवघ्या 10 रुपयांमध्ये गरम, सकस अन्न गरजूंना मिळत होतं. ही योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाली होती. मात्र महायुती सरकारच्या काळात या योजनेचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. सरकारची अनास्था आणि असंवेदनशीलता यामुळे आज गरिबाच्या ताटात उपासमारीचा अंधार पसरला आहे.
कोट्यवधींची बिले थकीत
गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील अनेक शिवभोजन केंद्रांची कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहेत, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. यामुळे केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या उपजीविकेचा मार्गच बंद होऊ लागला आहे. ही केंद्रे म्हणजे केवळ जेवण देणारे ठिकाण नव्हते, तर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार होती, असं त्यांनी नमूद केलं.
यशोमती ठाकूर यांनी सरकारच्या आर्थिक धोरणावरही सवाल उपस्थित केला. आज या सरकारकडे ना ठेकेदारांना देण्यासाठी निधी आहे, ना सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी पैसा शिल्लक आहे, ना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कोणताही आराखडा आहे. सत्तेवर येण्याआधी ज्या योजनांना डोळे झाकून मंजुरी दिली गेली, त्या सगळ्या घोषणा आता आर्थिक बोजा बनल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
Devendra Fadnavis : पणतीपासून पॅनलपर्यंत, महाराष्ट्राच्या ऊर्जायात्रेचा सौरसंकल्प
गंभीर इशारा
मतांसाठी लाडक्या बहिण योजनेत चार हजार 800 कोटींचा घोटाळा झाला. आर्थिक तरतुदी देताना सरकारनं राज्याच्या खऱ्या आर्थिक परिस्थितीचा विचारच केला नाही. त्यामुळे आता राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभं आहे, असा गंभीर इशाराही ठाकूर यांनी दिला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना थेट उद्देशून ठाकूर म्हणाल्या, राज्याच्या जनतेला उपाशी ठेवू नका. सत्ता म्हणजे तुंबलेल्या फायलींचं आणि घोषणांच्या जाहिरातींचं साम्राज्य नाही. ती आहे ताटातील भाकर आणि जनतेच्या जीवनातील आश्वासन. त्यावर मस्तीत पाय देण्याचं काम करू नका.
शिवभोजन योजना ही 2020 मध्ये सुरू झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र सध्या निधीअभावी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही योजना कोमेजू लागली आहे. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास राज्यातील गोरगरीबांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा इशाराच ठाकूर यांनी दिला.
राजकीय वर्तुळात यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यांमुळे खळबळ उडाली आहे. सरकारकडून या गंभीर आरोपांना काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्या प्रश्न एकच की, शिवभोजन थांबलं आणि जनतेच्या ताटात सत्ता आली; पण अन्न कुठं गेलं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.