
महाराष्ट्रातील फॉक्सकॉन प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील जेवर येथे उभारण्यास मंजुरी दिली आहे. यावरून आता विरोधक आक्रमात होतांना दिसत आहेत.
देशातल्या तंत्रज्ञान क्रांतीसाठी महत्त्वाचा ठरणारा महाराष्ट्रातील अर्धसंवाहक (Foxconn) प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशच्या झोळीत गेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 हजार 706 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. या निर्णयानंतर राजकीय वादळ पुन्हा उसळले आहे. एकेकाळी महाराष्ट्रासाठी आरक्षित असलेला हा प्रकल्प प्रथम गुजरातला व आता उत्तर प्रदेशात स्थायिक होत असल्यामुळे राज्यात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीस महाराष्ट्रासाठी ठरलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, नंतर गुजरातमध्ये गेला आणि आता त्याच प्रकल्पाची अद्ययावत आवृत्ती जेवर येथे उभारली जाणार आहे.
केंद्राची ही बाब काँग्रेससह इतर विरोधकांच्या रोषाचे कारण ठरली आहे. राज्याच्या हातातोंडाशी आलेला अर्धसंवाहक प्रकल्प गेल्याने उद्योग व रोजगाराच्या संधीदेखील हातच्याच गेल्या, असा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातहून उत्तर प्रदेशात स्थलांतरित झाल्याचे ऐकून मन सुन्न झाले. महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलेली ही सुवर्णसंधी हुकवली गेली. हजारो युवकांना रोजगार आणि राज्याला भक्कम गुंतवणूक मिळू शकली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली. त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील भ्रष्टयुती सरकारने केंद्रासमोर गुडघे टेकले आहेत.

संधी पुन्हा गेली
मोठा प्रकल्प दिला जाईल अशी आश्वासने देऊन एकामागोमाग एक प्रकल्प गुजरात व आता उत्तर प्रदेशात पळवले गेले. पण महाराष्ट्र सरकार मात्र शांत असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारच्या काळात उभारण्यात आलेल्या उद्योगनीतीशी याची तुलना केली. उत्तर प्रदेशातील जेवर येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात एचसीएल आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्त भागीदारीत चिप्स निर्मिती होणार आहे. मोबाईल, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स आणि इतर स्मार्ट उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिस्प्ले ड्रायव्हर चिप्सची निर्मिती येथे केली जाईल. प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे दरमहा 20 हजार सेमीकंडक्टर वेफर्सवर प्रक्रिया केली जाईल आणि 3.6 कोटी चिप्स उत्पादनात येतील.
देशातील हा सहावा सेमीकंडक्टर प्रकल्प ठरणार असून उत्तर प्रदेशसाठी मात्र पहिलाच आहे.महाराष्ट्रातील उद्योगप्रेमी आणि तरुण वर्गासाठी हा एक दणका मानला जात आहे. फॉक्सकॉन, जे एक जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उत्पादन करणारे ब्रँड आहे. अशा कंपनीचा प्रकल्प जर महाराष्ट्रात स्थायिक झाला असता, तर हा एक गेम चेंजर ठरला असता, असे अनेकांचे मत आहेत. राजकीय मतभेद आणि व्यवस्थात्मक ढिसाळपणा यामुळे महाराष्ट्राच्या हातातून गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाचे प्रकल्प गेले आहेत. आता पुन्हा एकदा एक सुवर्णसंधी दुसऱ्या राज्याच्या पदरात पडल्याने राज्याच्या औद्योगिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
राज्य शासनाकडून अद्याप या संदर्भात कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विरोधकांचा आरोप आहे की केंद्राकडून मिळणाऱ्या मोठ्या प्रकल्पांच्या आश्वासनावर महाराष्ट्र वारंवार गाफील राहत आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहतो महाराष्ट्रात अशा प्रकल्पांची वेगाने अंमलबजावणी करणारी व इच्छाशक्ती दाखवणारी व्यवस्था केव्हा उभी राहील?