महाराष्ट्र

Amravati : नळातून अमृत नाही, विषधार वाहतेय 

Water Crisis : पाण्याच्या प्रत्येक थिंबात असुरक्षिततेची झुळूक 

Author

अमरावती जिल्ह्याच्या नळांमधून येणारं पाणी आता अमृत नव्हे, तर आरोग्याला घातक ठरत आहे. 5 हजारांहून अधिक नमुन्यांपैकी तब्बल 54 ठिकाणचं पाणी दुषित आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

गावोगावी नळातून येणाऱ्या पाण्यातच धोक्याचे घटक आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील हजारो पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर तब्बल 54 ठिकाणचं पाणी दुषित आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असताना, याच पाण्यातून गंभीर आरोग्यधोके समोर येत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील विविध गावांतून पाणी नमुने गोळा करून त्यांचे रासायनिक आणि जैविक परीक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांतील एकूण पाच हजार 867 जलनमुन्यांची तपासणी झाली असून त्यातील 54 ठिकाणचं पाणी दुषित असल्याचं स्पष्ट झालं आहे

जैविक दूषितता

या जलनमुन्यांपैकी दोन हजार 113 नमुन्यांचं रासायनिक आणि तीन हजार 796 नमुन्यांचं जैविक परीक्षण करण्यात आलं. यामध्ये 28 ठिकाणी रासायनिक दूषितता आणि 26 ठिकाणी जैविक दूषितता आढळून आली. विशेष म्हणजे, 62 ठिकाणच्या पाण्याचे दोन्ही प्रकारचे परीक्षण करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याठिकाणी अधिक बारकाईने विश्लेषण करण्यात आले.

या धक्कादायक निष्कर्षानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी तातडीने त्या गावांतील आरोग्य यंत्रणांना अलर्ट करून कार्यवाही सुरु केली आहे. ज्या ठिकाणी पाणी दूषित आढळले, तेथे संबंधित पाणीपुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला असून नागरिकांना पर्यायी जलव्यवस्था करून देण्यात आली आहे.

Ravindra Singhal : नशाविरोधात पोलिसांचा लढा अधिक तीव्र

आजार पसरण्याची शक्यता

‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला हा तपशीलवार अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी जलस्रोतांची पाहणी आणि जलशुद्धीकरणाची मोहीम सुरु केली आहे. इतर गावांमध्येही अशाच प्रकारची स्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासन अधिक जागरूक झालं आहे. या जलप्रदूषणामुळे डायरिया, टायफॉईड, हेनाटायटिस यांसारखे आजार पसरण्याची शक्यता मोठी असल्याने, नागरिकांना उकळून पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय घरगुती पाणी टाक्यांची नियमित स्वच्छता, आणि जलस्रोतांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

पाणी हे जीवन आहे, मात्र तेच दूषित असेल तर ते जीवनाचा शत्रू बनतं. त्यामुळे हे केवळ अहवालापुरतं न राहता, प्रत्येक गावाच्या पातळीवर आरोग्य चळवळ म्हणून बघण्याची ही वेळ आहे. नागरिक, आरोग्य सेवक, स्थानिक प्रशासन, सगळ्यांनी एकत्र येऊन पाण्याच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलणं अत्यावश्यक आहे. अमरावती जिल्ह्यातील ही जलदूषितीची कथा केवळ आकड्यांमध्ये अडकून न राहता, ‘शुद्ध पाणी, सुरक्षित जीवन’ या जनआंदोलनाची ठिणगी ठरावी, अशीच अपेक्षा आहे. कारण पाणी म्हणजे जीवन आणि जीवनात विष नकोच.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!