महाराष्ट्र

Nitin Gadkari : देश प्रवचनांनी सुधारत नाही, पण कृतीने घडतो 

Prime Minister Post : पंतप्रधानपदाबाबत गडकरींचं सडेतोड आत्मभान

Author

जर मी पंतप्रधान झालो, तरीही देश भाषणांनी नव्हे तर कामगिरीने बदलतो, असं परखड मत नितीन गडकरींनी एका मुलाखतीत मांडलं. त्यांच्या विचारशील आणि थेट शैलीतील हे उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे.

राजकारणात स्पष्ट मत मांडणारे आणि कामगिरीवर विश्वास ठेवणारे फारच कमी नेते असतात. अशा थोडक्याच लोकांमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री विकासपुरुष नितीन गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या वक्तव्यांमध्ये प्रामाणिकपणा, विनोदबुद्धी आणि तत्त्वज्ञान यांचा समतोल आढळतो. नुकतीच त्यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.

या मुलाखतीत गडकरींना विचारण्यात आले की, तुम्हाला जर जादूची कांडी मिळाली किंवा तुम्हाला 24 तासांसाठी पंतप्रधान बनवलं गेलं, तर तुम्ही काय कराल? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी त्यांच्या शैलीत मार्मिक पण गूढ आणि विचारप्रवृत्त करणारे विधान केलं. गडकरी म्हणाले, माझे एक मित्र रामदास फुटाणे. ते हास्य व्यंग कवी होते. त्यांची एक ओळ आहे, ‘हा देश प्रवचनांनी सुधारला नाही आणि बदमाशांमुळे काही बिघडलेला नाही’. हे जग प्रत्येकाच्या हिशोबाने चालत असतं. कोणी कसं वागतं, कशा पद्धतीने जगतं यापेक्षा, आपण स्वतः कसं जगावं, पुढे कसं जावं याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.

Nitin Gadkari : विदर्भातील वाळवंटात ‘मनोरंजनाचा मरिन ड्राईव्ह’

परिवर्तन स्वतःपासून हवं 

या उत्तरातून त्यांनी एका क्षणात ‘पंतप्रधानपदाची स्पर्धा’ आणि ‘प्रभावी नेतृत्व’ या चर्चांना बाजूला सारत, स्वतःच्या आचारविचारांची सखोल भूमिका मांडली. गडकरी म्हणाले की, दुसऱ्यांकडे बोट दाखवून किंवा लोकांना उपदेश देऊन काहीच बदलत नाही. खरं परिवर्तन तेव्हाच शक्य होतं, जेव्हा आपण स्वतःपासून सुरूवात करतो. गडकरी पुढे म्हणाले, दुसऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यावर आरोप करणे मला कधीच आवडले नाही. त्याऐवजी मी स्वतःमध्ये काय सुधारणा करू शकतो, मी देशासाठी काय चांगलं करू शकतो, हाच माझा अजेंडा आहे. याच विचाराने मी राजकारणात काम करत राहतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी हे एक प्रभावी नाव असल्याची चर्चा अनेक वेळा रंगलेली आहे. त्यांच्या विविध भाषणांमध्ये आणि मुलाखतींमध्ये त्यांनी राष्ट्रीय विकास, धोरणात्मक निर्णय, पर्यावरणपूरक प्रकल्प, शेती आणि रोजगार यावर आपली स्पष्ट मते मांडली आहेत. त्यामुळे त्यांचं नाव संभाव्य दावेदारांच्या यादीत कायम चर्चेत असतं.

बोलण्याला नाही कृतीला महत्त्व

मात्र, गडकरी वारंवार यावर भाष्य करताना व्यक्तिश्रयी सत्ता किंवा पदाच्या मागे न धावता, कार्य, कर्तव्य आणि समाजोपयोगी निर्णय यावर भर देतात. हीच गोष्ट या मुलाखतीतही अधोरेखित झाली. त्यांनी शेवटी सांगितले, मी काय बोलतो त्याला फारसं महत्त्व नाही, मी काय करतो हे महत्त्वाचं आहे. मी नेहमी माझ्या कामातून देशासाठी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करत असतो. मी पंतप्रधान नसलो तरी माझी जबाबदारी तशीच मोठी आहे. ती मी प्रामाणिकपणे निभावत राहणार.

नितीन गडकरींच्या या सडेतोड आणि विचारप्रधान उत्तरामुळे त्यांची ही मुलाखत लोकांच्या मनाला भिडतेय. त्यांच्या शैलीतील सहजता, स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिक आत्मपरीक्षण आजच्या राजकीय धुरंधरांना एक वेगळा आरसा दाखवतो. पंतप्रधानपदाच्या चर्चेपेक्षा, त्यांच्या या मुलाखतीतून प्रगल्भ राजकारण, कर्तव्यनिष्ठा आणि आत्ममूल्यांची खरी जाणीव देशवासीयांना अनुभवायला मिळाली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!