
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानंतर आता शालेय शिक्षणाबाबत शासनाने आणखी काही निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अवलंब करून त्यात राज्यानुसार आवश्यक ते बदल करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिल्या आहेत. शिवाय राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत अनिवार्य होणार असल्याची माहिती आहे. याविषयी शालेय विभागाची बैठक झाल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी समाज माध्यमाशी संवाद साधताना माहिती दिली.
मंत्री दादा भुसे म्हणाले की, सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून सीबीएसई पॅटर्नमध्ये राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे. शाळेच्या गुणवत्तेनुसार शाळांना रँकिंग देणे. एका केंद्रातील किमान एका शाळेत दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था असावी. त्या शाळा आदर्श आणि त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. केंद्रीय शिक्षण पद्धतीच्या गरजेनुसार अवलंब केला जाईल. चालू वर्षात इयत्ता पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्नचा विचार आपण करत आहोत. पुढच्या टप्प्यात सीबीएसई पॅटर्नच्या काही चांगल्या गोष्टी आपण शाळांमध्ये घेणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले आहे. दादा भुसे पुढे म्हणाले की, यापुढे राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत म्हणणे देखील अनिवार्य होणार आहे. परिपाठावेळी राज्यगीत म्हणणण्याचा नियम आहे. पण राज्यातील अनेक शाळांमध्ये असे काहीही होताना दिसून येत नाही. म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हटल्यानंतर राज्यगीत सक्तीचे करण्यात येणार आहे, असेही दादा भुसे म्हणाले.

शाळांना लागू शकते कुलूप
राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. ज्या शाळांमध्ये मराठी शिकवल्या जात नाही. त्या शाळांविरुद्ध आता कारवाई करण्यात येणार आहे. इंग्रजी भाषा आवश्यक आहे. परंतू महाराष्ट्रात मराठीचे महत्त्व सर्वांत जास्त आहे. मराठीबद्दलची अनास्था खपवून घेतली जाणार नाही. मराठीला दुय्यम स्थान दिलं जाऊ शकत नाही, असेही दादा भुसे म्हणाले होते. इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी तसे होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर आता कारवाई करण्यात येणार असल्याचंही भुसे यांनी सांगितलं होत.
सरकारच्या नियमानुसार आता शाळेतील शिक्षकांनाही मराठीचं ज्ञान असणं गरजेचं राहणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे असल्याचा कायदा झाला, अशी माहिती दादा भुसे यांनी यावेळी दिली. सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांना हा नियम बंधनकारक असेल. या नियमाच्या पालनाबाबत शिक्षण विभागाला सूचना देण्यात् आली आहे. नियमाचं पालन न करणाऱ्या शाळांना प्रसंगी कुलूप लागू शकते, असंही दादा भुसे म्हणाले होते.