
दापोरी शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात अमरावती जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळाला. गुणवत्तेच्या बळावर शाळेने राज्यात नावलौकिक मिळवला.
राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, या अभियानात दापोरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला. या यशस्वी कामगिरीसाठी शाळेला 3 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. अमरावती जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती आत्मसात करणारी ही पहिली जिल्हा परिषद शाळा असल्याचा मानही दापोरी शाळेने मिळवला आहे.

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहापात्रा यांच्या हस्ते या गौरवप्राप्त शाळेचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक गजानन चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश अंधारे, ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात शाळांची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शैक्षणिक प्रगती, प्रशासनातील नवचैतन्य, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य विषयक उपक्रम, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणारे उपक्रम, विद्यार्थ्यांमधील कौशल्यविकास, कला-क्रीडा क्षेत्रातील सहभाग अशा विविध निकषांचा समावेश होता. या सर्व निकषांमध्ये दापोरी शाळेने उजवा ठसा उमठवला. शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अध्यापन आणि अभ्यासक्रम अधिक प्रभावी केला जात आहे. शाळेच्या डिजिटल शिक्षण प्रणाली, स्मार्ट बोर्ड, संगणक सुविधा, ग्रंथालय अशा गोष्टींनी शिक्षणाच्या दर्जात मोठी भर घातली आहे.
दापोरी गावातील ग्रामस्थ, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावकऱ्यांनी शाळेच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकसंघ प्रयत्न झाले आहेत. यामुळेच दापोरी शाळेचा यशाचा प्रवास आज राज्यातही आदर्श ठरत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश अंधारे आणि ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी शाळेच्या भविष्यातील योजनांवर भर देत ही गुणवत्ता टिकवण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ही शाळा सातत्याने कार्यरत आहे.
पुढील वाटचाल
दापोरी शाळेची कीर्ती इतकी वाढली आहे की राज्यातील विविध भागांतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि अधिकारी येथे अभ्यास दौऱ्यावर येत आहेत. या शाळेने गुणवत्तेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अनेक शाळांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. शाळेतील सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी कठोर मेहनत घेतली आहे. विविध स्पर्धा, उपक्रम, प्रकल्प यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि ज्ञानक्षमता वाढवली गेली आहे. परिणामी, दापोरी शाळेने प्रत्येक परीक्षेत उत्तुंग यश मिळवत राज्यात आपले नाव निर्माण केले आहे.
यशप्राप्तीच्या सन्मान समारंभाला शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रगती सकर्डे, सदस्य दिनेश श्रीराव, संकेत भोरे, माधुरी घोंगडे, संध्या दारोकर, पुष्पा आगरकर, नितल श्रीवास, साक्षी चौधरी, दीपक धुर्वे, भरती देऊळकर, नंदकिशोर लुंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल गावकऱ्यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. दापोरी शाळेच्या या यशामुळे गावाचा गौरव वाढला असून, ही प्रेरणा पुढील पिढ्यांनाही गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी दिशा दाखवणार आहे. एकात्म प्रयत्न, दृढ निश्चय आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या आधारावर दापोरी शाळेचा हा यशस्वी प्रवास पुढेही अशीच भरारी घेईल.