महाराष्ट्र

Dawwa Gram Panchayat : गोंदियाचा डंका देशभरात वाजला

Gondia : डव्वा ग्रामपंचायतीला देशातला सर्वोच्च जलवायु कृती पुरस्कार

Author

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीने संपूर्ण देशात आपलं नावलौकिक मिळवत ‘जलवायु कृती विशेष पंचायत पुरस्कार’ पटकावला आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांच्या जोरावर या छोट्याशा गावाने राष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवलं आहे.

एखादं छोटं गाव देशभरात नाव कमवू शकतं का? हो, शक्य आहे आणि हे सिद्ध केलंय गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीने. देशातील हजारो पंचायतीमध्ये डव्वा ग्रामपंचायतने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. डव्वा ग्रामपंचायतीला ‘जलवायु कृती विशेष पंचायत पुरस्कार 2023 – 24’ मिळाला आहे. तोही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते.

हा पुरस्कार मिळाला बिहारमधील मधुबनी येथे. जिथं देशभरातून आलेल्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींचं सन्मान करण्यात आलं. यात गोंदियाच्या डव्वा गावाने बाजी मारली. पुरस्कार मिळवणं हेच मोठं नव्हतं तो मिळवण्यासाठी त्यांनी केलेलं काम खूप प्रेरणादायी आहे. या यशामागे आहेत डव्वा ग्रामपंचायतीच्या तडफदार सरपंच योगेश्वरी चौधरी. त्यांनी गावात सौर ऊर्जा, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त मोहिमा, वृक्षारोपण, आणि पर्यावरण जागृती या सगळ्या गोष्टींवर भर दिला. ‘गो ग्रीन’ ही संकल्पना फक्त शहरात मर्यादित न ठेवता त्यांनी ती गावात प्रत्यक्षात उतरवली.

यशाचा प्रवास

पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नव्हे, यामध्ये एक कोटींची रोख मदत, प्रशस्तिपत्र, आणि प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. ही रक्कम आता गावाच्या पुढील पर्यावरणीय प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. डव्वा ग्रामपंचायतीचा हा यशाचा प्रवास एकट्या सरपंचांचा नाही, ही संपूर्ण गावाची टीमवर्कची गोष्ट आहे. गावकऱ्यांचा पाठिंबा, तरुणांचा सहभाग, आणि महिलांचा सक्रीय सहभाग हे सगळं या यशामागचं खऱं बळ आहे.

Chandrashekhar Bawankule : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सावली नको

डव्वा गावाच्या या यशामुळे गोंदिया जिल्ह्याची नवी ओळख तयार झाली आहे. केवळ कृषी आणि जंगलांनी समृद्ध नव्हे, तर पर्यावरणासाठी काम करणारा जिल्हा म्हणूनही. ही गोष्ट इतर गावांसाठी एक बेंचमार्क ठरणार आहे. आपण नेहमी शहरांकडे बघतो, पण खऱ्या बदलाची चळवळ आता गावांमध्ये सुरु झाली आहे. डव्वासारखी गावं हे दाखवत आहेत की पर्यावरण रक्षण ही फक्त चर्चा नाही, ती कृती आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या डव्वा ग्रामपंचायतीचा हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. ग्रामीण भागातूनही पर्यावरण रक्षणाच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत, हे या पुरस्कारातून सिद्ध झाले आहे. जलवायु बदलासारख्या जागतिक संकटाशी सामना करण्यासाठी अशा ग्रामपंचायतींचा पुढाकारच खऱ्या अर्थाने देशाचा आधारस्तंभ ठरतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!