
चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन येथे कुष्णरुग्णांवर उपचार केले जातात. महारोगी सेवा समितीला हे कार्य करण्यासाठी भरीव निधी देण्यात आला आहे.
महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन येथे ही संस्था कार्यरत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 01.86 कोटी रुपयांचा निधी या संस्थेला दिला आहे. यातून उपचार आणि पुनर्वसन कार्य करण्यात येणार आहे. आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी 1 कोटी 22 लाख रुपये पवार यांनी दिले आहेत. त्यामुळं आनंदवन येथील संस्थेला तीन कोटी आठ लाख रुपयांचा एकूण निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आनंदवन येथील संस्थेला तातडीनं देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरीत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली आहे. पवारांनी घेतलेल्या या पुढाकारामुळं बाबा आमटे व साधना आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. महारोगी सेवा समितीचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे. सध्या या संस्थेचं काम डॉ. विकास आमटे पाहतात. संस्था आर्थिक अडचणीत असल्याची बाब संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर पवारांनी यासंदर्भात पावले उचलली.

आमटेंना आदरांजली
बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी संस्था सुरू केली. 75 वर्षांपूर्वी 1949 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे त्यांनी कामाला सुरुवात केली. महारोगी सेवा समितीची स्थापना करीत त्यांनी काम सुरू केलं. संस्थेचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. मात्र संस्थेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही बाब डॉ. विकास आमटे यांनी अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पवारांनी तातडीनं याबाबत निर्णय घेतला. आता हा निधी संस्थेला मिळाला आहे.
सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कुष्ठरुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचं कार्यही येथे करण्यात येत आहे. प्रकल्पांत पुनर्वसित दीड हजार कुष्ठरोग मुक्त आहेत. दिव्यांग, निराधार, वृद्ध, अनाथ, परित्यक्ता, मानसिकदृष्ट्या अपंगांची काळजीही येथे घेतली जाते. त्यांच्या मुलांचीही काळजी घेतली जाते. विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. येथे सुमारे तीनशे दिव्यांगांना प्रशिक्षण व शिक्षण दिलं जातं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षणाची सोयही उपलब्ध आहे. विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. त्यामुळं आनंदवन येथील संस्थेला सरकारकडून मदतीचा हात देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.