संपूर्ण विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी याबाबत तातडीचे पाऊल उचलत महत्वाची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात यंदा पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भातील अकोला, वाशिम आणि पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली, जमिनी खरडल्या आणि अनेक ठिकाणी शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले. गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटात शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीने पावले उचलली जावीत, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.
ऑगस्ट 2025 दुसऱ्या आठवड्यात अकोलासह पश्चिम विदर्भात झालेल्या अतिवृष्टीने परिस्थिती आणखी बिकट केली. नदी-नाल्यांना आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी पिके उद्ध्वस्त झाली. गावांमधील रस्ते आणि पूल खचल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत आमदार रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांचा आवाज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांनी 17 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विदर्भातील नुकसानीचा आढावा सादर केला.
Political Drama : काँग्रेसच्या ढोंगीपणावर प्रकाश आंबेडकरांचा तिखट टोमणा
आर्थिक मदतीची मागणी
तातडीने आर्थिक मदत व पुनर्वसनासाठी पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली. आमदार रणधीर सावरकर यांनी केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील बाधित नागरिकांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री आकाश फुंडकर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याबरोबरच, खराब झालेले रस्ते आणि पूल दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
आमदार रणधीर सावरकर यांनी स्थानिक प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांना केली आहे. या संकटकाळात रणधीर सावरकर यांचा हा पुढाकार शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून, यावेळीही त्यांनी सरकारवर दबाव टाकण्यासाठी कंबर कसली आहे. विदर्भातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना या संकटातून सावरण्यासाठी तातडीने मदत मिळावी, यासाठी रणधीर सावरकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या लढ्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता सरकार कशा प्रकारे प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
