तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट हॅक झाल्याने सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
सध्या एकविसाच्या शतकातील भारत हे तंत्रज्ञानाच्या लाटेत बुडालेले आहे. मोबाईल स्क्रीनवरून जगभरातील बातम्या, राजकारण आणि मनोरंजन एका टचने हातात येते. पण हीच तंत्रज्ञानाची चमक अनेकदा डोकेदुखीचे कारण ठरते. सोशल मीडिया हे आता सामान्य माणसापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांचे आवडते व्यासपीठ झाले आहे. एका क्लिकने बातम्या शेअर करणे सोपे झाले, पण त्याचवेळी सायबर हल्ल्यांचा धोका वाढला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात अशीच एक धक्कादायक घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट हॅक झाले. रविवारी (21 सप्टेंबर) दुपारी ही घटना घडली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हॅकर्सनी अकाउंट ताब्यात घेऊन पाकिस्तान आणि तुर्कीच्या ध्वजांचे फोटो पोस्ट केले, जे आशिया कपच्या भारत-पाकिस्तान सामन्याशी जोडले जात आहेत.
फोटो लाईव्ह-स्ट्रीम करून हॅकर्सनी राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला असावा, पण यामुळे फक्त गोंधळच माजला. शिंदे गटाचे प्रमुख आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक्सचा वापर करतात, ज्यामुळे त्यांचे अकाउंट हे राजकीय चर्चेचे केंद्र असते. पण रविवारी हा ‘डिजिटल राजा’च हॅक झाला. हॅकर्सनी अकाउंटवरून पाकिस्तानी आणि तुर्की ध्वजांसह काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले. जे आशिया कपच्या सामन्याच्या दिवशी घडले. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पसरलेल्या अफवांमुळे राजकीय तणाव वाढला. तात्काळ कारवाई करून शिंदे यांच्या कार्यालयातील तांत्रिक पथकाने प्रयत्न सुरू केले. तब्बल 40 ते 45 मिनिटांच्या संघर्षानंतर अकाउंट पूर्ववत झाले. अधिकाऱ्यांच्या मते, यावेळी कोणतीही संवेदनशील माहिती गळाला गेली नाही.
IPS Vishal Anand : खोट्या पोलीसांचा पर्दाफाश, नागरिकांमध्ये दिलासा
सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण
अकाउंट आता सामान्यपणे कार्यरत आहे. पण ही घटना केवळ एका नेत्याची नाही, तर संपूर्ण राजकीय डिजिटल विश्वातील असुरक्षिततेचे प्रतीक ठरली आहे. या हॅकिंग घटनेने महाराष्ट्रातील राजकारणात एकच धुरळा उडवला. उपमुख्यमंत्री सारखे मोठे नेते सुरक्षित नसेल, तर सामान्य जनतेचे काय? यावरून विरोधी पक्षातील नेते धडकले. विशेषतः काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी या प्रकरणावरून सरकारला चांगलेच झोडपले आहे. पटोले यांनी X वर एक लांबलचक पोस्ट करून सायबर सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून गृहखात्यावर टीका केली. त्यांनी म्हटले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे X अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना घडली. राज्यातील इतक्या महत्त्वाच्या मंत्र्यांचे सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित राहू शकत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या सायबर सुरक्षिततेचे काय? हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या Gen-Z पिढीला नक्की पडणार आहे.
पटोले यांचा हा सवाल केवळ राजकीय नाही, तर सामाजिक जागृतीचा आहे. ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांचे अकाउंट हॅक होणे म्हणजे राज्याच्या गृहखात्याच्या सुरक्षिततेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. याची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांच्या सायबर संरक्षणासाठी सरकारकडे नेमकी कोणती ठोस यंत्रणा आहे? याचे स्पष्ट उत्तर गृहखात्याने द्यावे. नाना पटोले यांची टीका येथेच थांबली नाही. त्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या ‘गोल्डन डेटा’ योजनेवरूनही सरकारला कोंडून ठेवले. सरकारने नुकतीच ‘गोल्डन डेटा’ योजना आणण्याची घोषणा केली आहे. पण जेव्हा सरकारमधील प्रमुखांचे अकाउंटच सुरक्षित नाही, तेव्हा सरकारी वेबसाइट्स व शासकीय डेटाची सुरक्षितता कितपत भक्कम आहे, हा प्रश्न अधिक गंभीर बनतो, असे पटोले म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. Gen-Z पिढीला उद्देशून बोलताना त्यांनी डिजिटल युगातील सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले.