पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, ही सेवा 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या निर्णयामागे खासदार अनुप धोत्रे यांचा महत्त्वपूर्ण पाठपुरावा आहे.
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेला अखेर केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. येत्या 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वेगवान रेल्वे गाडीचे उद्घाटन होणार आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी पूर्ण झाली असून, हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
ही मंजुरी म्हणजे केवळ रेल्वेचा विस्तार नाही, तर विदर्भाच्या मनातील स्वप्नांची पूर्तता आहे. गेल्या काही महिन्यांपासून अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी अकोल्यातील वाढत्या प्रवाशांना पाहता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अनुप धोत्रे यांचा संघर्ष अखेर यशस्वी ठरताना दिसत आहे. यामुळे विदर्भातून आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार. त्यांनी वेळोवेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी लावून धरली होती. रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी अनेक बैठकांमधून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर विदर्भाच्या या आवाजाला दिल्लीने मान्यता दिली.
Swachh Bharat Mission : नागपूरने स्वच्छतेच्या लढ्यात घेतली तेजस्वी उडी
प्रगतीला वेग
अनुप धोत्रे म्हणाले, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारी ही सेवा म्हणजे एक ऐतिहासिक टप्पा आहे. शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि व्यापार क्षेत्रातील लोकांसाठी ही गाडी नवसंजीवनी ठरणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या गाडीमुळे विदर्भाच्या हृदयातून म्हणजेच नागपूर, अकोला, वर्धा, बडनेरा अशा शहरांमधून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेससाठी सुमारे 900 किलोमीटरचे अंतर फक्त नको ते साडेनऊ तासांत पार करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित थांबे निश्चित केले आहेत. पुणे – दौंड – अहिल्यानगर – कोपरगाव – मनमाड – जळगाव – भुसावळ – अकोला – बडनेरा – वर्धा – अजनी (नागपूर) या ठिकाणी ही जलद सेवा थांबेल. या विशेष नियोजनामुळे सध्या लागणारा प्रवासाचा वेळ सुमारे दीड ते दोन तासांनी कमी होणार आहे.
अधिकृत मंजुरी
मध्य रेल्वे बोर्डाचे प्रधान सचिव सतीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण व्हिडीओ परिषद झाली. यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस व अमृत भारत योजनेच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत पुणे-नागपूर मार्गासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली. सध्या पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर आणि हुबळी या मार्गांवर वंदे भारत धावत आहे. आता नागपूरही त्या मानकाच्या गाड्यांच्या यादीत सामील होणार आहे.
ही गाडी केवळ एक प्रवासी सुविधा नाही, तर नव्या भारताच्या गतिमानतेचं प्रतीक आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक नात्याला नवी दिशा देणारा हा उपक्रम अनेक नव्या संधींना जन्म देणार आहे. नागपूर-पुणे दरम्यानचा प्रवास आता केवळ गाडीचा नाही, तर विकासाचा होणार आहे.
खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ही सेवा आता प्रत्यक्षात येत आहे, हे निश्चितच त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेचं आणि जनहितासाठीच्या लढ्याचं उत्तम उदाहरण ठरतं. विदर्भाच्या आवाजाला केंद्रात वजन देणारा नेता म्हणून अनुप धोत्रे आता अधिक ठामपणे पुढे आले आहेत. ही वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे केवळ एक रेल्वे गाडी नव्हे, तर विदर्भाच्या स्वप्नांची वाटचाल. आता या स्वप्नांना गती मिळाली असून, एक नव्या युगाची सुरुवात होत आहे.