महाराष्ट्र

Nitin Gadkari : गुरूंच्या उपस्थितीत धापेवाड्याच्या मेकओव्हरची मुहूर्तमेढ

Pilgrimage Development : कोराडीच्या धर्तीवर होणार संपूर्ण कायापालट

Post View : 17

Author

कोराडीच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील आणखी एका तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. विकास कामांतून नागपूर जिल्ह्यातील नवं धापेवाडा दिसेल, असं गडकरी यावेळी म्हणाले.

नागपूर जिल्ह्यातील धापेवाड्याला धार्मिक दृष्टीनं मोठं महत्व आहे. या भागाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास होत असल्याचा मनापासून आनंद वाटतो. सर्वांच्या सहकार्यानं हे शक्य झाल्याचं मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खासदार श्याम बर्वे, आमदार अभिजित वंजारी, रघुसंत स्वामी महाराज मठाचे गादी पुरूष यशवंत पराते महाराज, चरणसिंह ठाकूर, आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, कोलबा स्वामी मठाचे गुरूही यावेळी उपस्थित होते.

दोन्ही मठातील मठाधिपतींच्या साक्षीनं गडकरी यांनी धापेवाडा येथील विकास कामांची श्रीगणेशा केला. यावेळी राज्यमंत्री डॉ. जयस्वाल यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची तोंडभरून स्तुती केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गडकरी हे धापेवाड्याचे सुपुत्र असल्याचं गौरवानं नमूद केलं. धापेवाड्याचा विकास आराखडा आता तयार झाला आहे. लवकरच या गावाचा कायापालट झालेला दिसेल. महायुतीचे हात बळकट केल्याबद्दल बावनकुळे यांनी सावनेरच्या जनतेचे आभार मानले.

Chandrashekhar Bawankule : विकास करू उत्कृष्ट, लागू नये कोणाचीही दृष्ट

दोन्ही नेते आग्रही

धापेवाड्याच्या विकासासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस नेहमीच आग्रही होते. त्यातून 164 कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला. धापेवाड्यातील रघुसंत स्वामी महाराज मठाचे गादी पुरूष यशवंत पराते महाराज, कोलबा स्वामी मठाचे गुरूजी आणि नागरिकांचे सहकार्य मिळाल्याचं बावनकुळे म्हणाले. पहिल्या टप्प्यात मूलभूत विकास केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पर्यटन आणि तीर्थस्थळ विकास करावा लागेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. धापेवाड्याला सर्व सोयींनी सुसज्ज रुग्णालय व्हावं, असंही बावनकुळे म्हणाले. या रुग्णालयात केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना येऊ शकतात असंही ते म्हणाले.

विदर्भात धापेवाडा हे महत्वाचं स्थान आहे. या भागातील पंढरपूर म्हणून धापेवाडा ओळखलं जातं. त्यामुळं या गावात विकास होणं गरजेचा होता. तीर्थक्षेत्र म्हणूनही धापेवाडा विकसित होत असल्याचा आनंद वाटतो. सततच्या पाठपुराव्यामुळं आता या प्रकल्पाचं भूमिपूजन होत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. देशाचा विकास करायचा असेल तर गावांचा विकास करावा लागेल. धापेवाड्याची नदी स्वच्छ होत आहे. गावाला स्वच्छ स्वरूप येणार आहे. त्यामुळं आता अस्वच्छता पसरविणाऱ्यांचा दंड करण्याचा सल्लाही गडकरी यांनी ग्राम पंचायतीला दिला. आपण धापेवाड्याचा विकास करण्यासाठी सोबत राहणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!