मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास कामांवर गंभीर लक्ष ठेवले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना कडक सुनावणी करत कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्काम करण्याचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एखादा मुख्यमंत्री अशा भागात राहून जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी वन कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचे सांगत गावकऱ्यांनी मेहनतीने तयार केलेला रस्ता नांगरणीच्या ट्रॅक्टरने खोदून टाकला होता. या घटनेमुळे संतापलेल्या फडणवीस यांनी बैठकीतच अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.
फडणवीस यांनी बापाचा माल आहे का? अशा कठोर शब्दांत अधिकाऱ्यांच्या कामशैलीवर घणाघात केला. शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री यावेळी संतापाच्या भरात अधिकाऱ्यांना झाडून काढताना दिसले. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या फडणवीस यांची ही भूमिका सर्वांना जाणवून गेली.
Harshwardhan Sapkal : आठ टक्क्यांची उडी संशयास्पद, आयोग मौन का?
वनविभागाच्या भूमिकेवर नाराजी
दुर्गम भागात नागरिकांनी स्वयंप्रेरणेने तयार केलेला रस्ता अधिकाऱ्यांनी वन कायद्याचा हवाला देत उद्ध्वस्त केला. रस्ता तयार करण्यासाठी गट्टी टाकण्यात आली होती, पण त्या रस्त्याची नोंद नसल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी नांगरणीचे ट्रॅक्टर चालवून तो नष्ट केला. हा प्रकार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्वरित दखल घेतली. त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट सूचना दिल्या की, त्रुटी शोधण्यात वेळ वाया घालवू नका. कार्यालयात जाऊन आवश्यक पत्रव्यवहार करा आणि लोकहिताचे निर्णय घ्या.
संपूर्ण जिल्हा नियोजन समितीच्या सभेतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना कामाचा जाब विचारला. त्यांच्या रोखठोक शैलीमुळे सभागृहातील वातावरण क्षणभर गंभीर झाले. मात्र, फडणवीस यांनी विकासकामांबाबत कोणतीही अडथळा सहन केला जाणार नाही, याची ठाम भूमिका मांडली.
Chandrashekhar Bawankule : बेकायदा स्टॅम्प पेपर मागणीवर बंदी
अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण
देवेंद्र फडणवीस 2019 मधील विधानसभा निवडणुकीदरम्यानही गडचिरोलीमध्ये मुक्कामी राहत होते. यावेळीही त्यांनी गडचिरोली पोलिस दलाच्या विश्रामगृहात राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा दौरा केवळ प्रशासकीय नसून राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण अशा सर्व आघाड्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
गडचिरोली जिल्हा माओग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. अशा भागात निवडणूक शांततेत पार पडाव्यात यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांशी समन्वय वाढवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची तयारी सुरू केली आहे. पोलिस यंत्रणेशीही त्यांनी संवाद साधत सुरक्षिततेबाबतची रणनीती ठरवली आहे.
भाजपच्या गडचिरोलीतील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फडणवीस यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्ष संघटन बळकट करण्यास सुरुवात केली आहे. मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी स्थानिक नेत्यांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
