महाराष्ट्र

गडचिरोलीत जवानाला वीरगती; Devendra Fadnavis होतील आणखी कठोर? 

नक्षलवाद निर्मूलनाच्या लढ्यात महेश नागुलवार शहीद; State Government कडून मोठी मदत जाहीर 

Author

गडचिरोलीत नक्षलवाद निर्मूलनाचा लढा सुरू आहे. त्यामधे पोलिस दलातील महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागुलवार श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. 

महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादविरोधी मोहिमांमध्ये सी-60 कमांडो दलाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या लढ्यात आपले प्राण अर्पण करणारे वीर जवान महेश नागुलवार यांच्या बलिदानाला संपूर्ण महाराष्ट्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शौर्याला सलाम करत, “नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,” असे ठाम शब्दांत सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात 11 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 कमांडो दलाने नक्षलवाद्यांविरोधात मोठे ऑपरेशन हाती घेतले. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, हे ऑपरेशन राबवण्यात आले आणि नक्षलवाद्यांचा एक मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात आला. या मोहिमेच्या यशामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या धडाकेबाज कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना नक्षलवाद्यांनी गोळी मारली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी देशासाठी आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण केले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत Eknath Shinde गटाचे मंत्री खफा खफा!

मोठी मदत जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकांशी थेट संवाद साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. नागुलवार यांच्या कुटुंबियांसोबत महाराष्ट्र शासन ठामपणे उभे असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शहीद महेश नागुलवार यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. त्यांचे कुटुंबीय विविध शासकीय योजनांमधून लाभार्थी होतील, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पोलिस दलाचा अभिमान

महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील सर्वात सशक्त आणि सक्षम पोलिस दल मानले जाते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात नक्षलवादाचा सामना करताना सी-६० कमांडोंनी वेळोवेळी आपली ताकद दाखवून दिली आहे. महेश नागुलवार यांचे हे बलिदान पोलिस दलाच्या लढाऊ आणि निःस्वार्थी वृत्तीचे प्रतीक आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशात सांगितले की, “महाराष्ट्र पोलिस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, आणि नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक जोमाने पुढे नेली जाईल.”

गडचिरोलीत गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण सत्र सुरू आहे. अनेक नक्षलवादी भीतीमुळे गडचिरोलीतील पोलिसांना शरण आले आहेत. त्यानंतर महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाल्याची ही पहिली घटना आहे. यामुळे नक्षलवाद्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी कठोर होतात का, यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!