महाराष्ट्र

Devendra Fadnavis : भाषणांचं पान खाऊन पोट भरत नाही 

Marathi Language Issue : ठाकरेंच्या राजकारणावर फडणविसांची वीज 

Author

महायुतीच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवत, मराठी माणसाचं पोट भाषणांनी नाही, कामांनी भरतं, असा टोला लगावला.

मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत खळबळजनक आरोप केले. “मराठी माणसाच्या नावावर भावना विकायच्या आणि त्याच मराठी जनतेला घराबाहेर काढायचं, ही डोळ्यांना झापडं लावणारी दुटप्पी भूमिका ठाकरे गटाची आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला.

पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सुरुवातच एका उपहासात्मक टोल्याने केली. मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो, कारण त्यांनी जेवढा गोंधळ घातला, त्या गोंधळातूनच जनतेने आमच्यावर विश्वास टाकला. त्यामुळेच महायुती सरकार स्थापन होऊ शकलं. पण यानंतर फडणवीसांनी थेट मुद्द्यावर येत उद्धव ठाकरेंच्या मराठी माणसाच्या नावे चालणाऱ्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे मराठी माणसाच्या कल्याणाबद्दल बोलतात, पण पत्रा चाळ, बीडीडी चाळ, अभ्युदय नगर, गिरगाव, या ठिकाणच्या मराठी जनतेच्या घरांचे काय? त्यांनी हे प्रश्न कधी उचलले का? उलट मराठी माणूसच मुंबई सोडून गेला, त्याला जबाबदार कोण? असा थेट सवाल फडणवीसांनी केला.

कागदपत्रं आमच्याकडे

फडणवीसांनी ठाकरे गटावर ठामपणे आरोप करताना पुढे म्हटलं की, मराठी माणसाच्या नावावर ठोकत भाषणं करायची आणि ‘धन्नासेठां’च्या मागे उभं राहायचं, हीच ठाकरे गटाची नीती आहे. पण आता प्रश्न विचारला पाहिजे की, मुंबई महापालिकेतील मराठी शाळा कुणी बंद केल्या? त्या सीबीएससीकडे का वळल्या? ही सगळी कागदपत्रं आमच्याकडे आहेत. मराठी माणूस भावनांनी नव्हे, त्याच्या हितासाठी घेतलेल्या ठोस निर्णयांनी समाधानी होतो.

फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणखी एक महत्त्वाचा आरोप करत स्पष्ट केलं की नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्र हे ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेलं. रघुनाथ माशेलकर समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांना प्राथमिक स्तरावर स्वीकारण्याची शिफारस केली होती. या अहवालावर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलं होतं. आज जे मराठी रक्षणाचं ढोंग केलं जातंय, तेच निर्णय उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने घेतले होते. आता याच मुद्द्यावर राजकारण करणं म्हणजे लोकांच्या बुद्धीचा अपमान आहे, असंही फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

Parinay Fuke : सहकारात पुन्हा एकदा विजयाचा चेंडू सीमा रेषेपार

मुंबईत परत आणण्याचं काम 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचं नाव पुढे करत त्याच मराठी जनतेला मुंबईबाहेर कसं काढलं याची माझ्याकडे दहा ठोस उदाहरणं आहेत. आज महायुती सरकार पुन्हा त्या मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचं काम करत आहे. पत्रकारांनी जेव्हा विचारलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, तेव्हा फडणवीसांनी अत्यंत संयमी पण तीव्र राजकीय संकेत देणाऱ्या शब्दांत उत्तर दिलं, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी एकत्र राहावं. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. पण जनता आता भावनांनी नव्हे, विकासाच्या मुद्द्यांवर निर्णय घेते.

देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत एका बाजूला उद्धव ठाकरे यांचे आभार मानत उपहासाच्या कटाक्षातून सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मराठी प्रेमाच्या ‘सुवर्णमुखवट्याखालील वास्तव’ जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आता या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात खरे प्रश्न कोण विचारतो आणि कोण फक्त घोषणांमध्ये अडकतो हे जनतेलाच ठरवायचं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!