
अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 831 कोटींचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर दिलासा मिळाला.
विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत, अमरावती शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नव्याने उभारलेल्या अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन पार पडले. या उद्घाटनाच्या सोहळ्याला राज्याचे ऊर्जामंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अनेक मंत्री, प्रशासनाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विदर्भातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना तब्बल 831 कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले.

शासनाच्या या निर्णयामुळे दीर्घकाळापासून संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2006 ते 2013 या कालावधीत विविध सिंचन प्रकल्पांसाठी सरळ जमीन खरेदी करण्यात आली होती. मात्र, वर्षानुवर्षे नुकसान सोसूनही बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नव्हता. अनेक आंदोलनं, मागण्या आणि संघर्षानंतर अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळाले. सरकारने त्यांचा न्याय्य हक्क मान्य करत सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरू केले.
आनंदाचा वर्षाव
पश्चिम विदर्भातील 14 हजार 149 हेक्टर जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना 700 कोटी रुपये, तर पूर्व विदर्भातील दोन हजार 484.20 हेक्टर जमीन देणाऱ्यांना 124 कोटी रुपये इतकं भरघोस अनुदान देण्यात आलं आहे. सर्वाधिक भूसंपादन अमरावती जिल्ह्यात झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना विशेष दिलासा मिळाला. अनुदान स्वरूपात प्रत्येकी प्रतिहेक्टरी 5 लाख रुपये देण्यात आले. जे अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन आले.
Devendra Fadnavis : आता अमरावती फक्त शहर नाही, पायलट घडवणारे जागतिक केंद्र
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, शेतकऱ्यांचे प्रश्न हे केवळ अनुदानाने सुटत नाहीत, त्यासाठी शाश्वत धोरणांची गरज आहे. आम्ही केवळ शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढत नाही, तर त्यांना विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करत आहोत. हा निधी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मदत ठरेल. विदर्भातील शेतकऱ्यांना केवळ जमीन गेलेली नाही, तर त्यांचं संपूर्ण जीवन उध्वस्त झालं. अनेकांनी या काळात कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या केल्या. त्यांच्या मागे असलेली कुटुंबं, मुलं, आणि भवितव्य अंधारात गेलं. या अनुदानामुळे त्यांना पुन्हा उभं राहण्याची संधी मिळेल, असं मत शेतकरी संघटनांनी व्यक्त केलं आहे.
अनेक शेतकरी आजही कर्जबाजारी आहेत. उत्पादन खर्च वाढला आहे, पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे, बाजारभाव अनिश्चित आहेत आणि विमा योजनाही अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे अनुदान ही केवळ सुरुवात आहे, अजूनही खूप काही करायचं आहे, अशी भावना या कार्यक्रमानंतर जनतेमध्ये व्यक्त झाली. या विमानतळामुळे अमरावती आणि संपूर्ण विदर्भाचे देशभराशी व परदेशाशी थेट संपर्क वाढेल. यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, व्यापारात गती येईल आणि गुंतवणूकदारांचा ओढा या भागाकडे वळेल. हे विमानतळ केवळ भौगोलिक संपर्काचा केंद्रबिंदू न राहता, विदर्भाच्या नव्या भविष्याचा प्रवेशद्वार ठरेल.