
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर यंत्रणांच्या अपुऱ्या माहितीकडे लक्ष वेधले आहे. पोलिसांनी 92 दंगेखोरांना अटक करत कठोर कारवाई सुरू केली आहे.
नागपूर शहरात नुकत्याच भडकलेल्या दंगलीमुळे शहराचे शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्टपणे मान्य केले की, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली माहिती काही प्रमाणात अपुरी ठरली. “गुप्तचर यंत्रणेला पूर्णपणे अपयश ठरले, असे म्हणणे अयोग्य ठरेल. मात्र, यंत्रणांकडून अधिक प्रभावी आणि सखोल माहिती गोळा होऊ शकली असती. जर गुप्तचर विभाग पूर्ण क्षमतेने आणि अलर्ट मोडवर कार्यरत राहिला असता, तर कदाचित परिस्थिती नियंत्रणात आणणे अधिक सोपे झाले असते,” असे सांगत त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.

घटनेचा मुख्य उगम महाल-गांधीगेट परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रतिकात्मक कृतीतून झाला. त्यांनी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक कबरीला आग लावली. विशेष म्हणजे, कबरीवर हिरव्या रंगाच्या चादरींसह आयत दर्शविल्या गेल्या होत्या. ज्यामुळे समाजात संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला. याच घटनेचा गैरफायदा घेत सोशल मीडियावरून योजनाबद्ध पद्धतीने खोटी माहिती आणि भडकावू संदेश पसरवण्यात आले. ज्यामुळे सोमवारी नागपूरच्या रस्त्यांवर मोठा तणाव निर्माण झाला.
Harshwardhan Sapkal: ड्रग्ज, हत्या, बलात्कार, अपमान; राज्याची सुरक्षा कोलमडली
कारवाईचे सत्र सुरू
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पोलिसांकडून घेतलेल्या तपशीलवार अहवालावर आधारित माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी घेतलेल्या व्हिडिओ फूटेजमधून आणि प्रसारमाध्यमांतील दृश्यांमधून 104 दंगेखोरांची ओळख पटवली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दंगल भडकवणाऱ्या 68 जणांचीही ओळख पटली असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रत्येक दंगेखोरावर कठोर कारवाई होईल. पोलिसांवर हल्ला करणे किंवा सामाजिक सलोखा बिघडवणे, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आतापर्यंत 3 पोलीस उपायुक्तांसह 35 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे संबंधित हल्लेखोरांना कोणतीही माफी नाही, असा ठाम संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
संचारबंदी शिथिल होणार
दंगलीमुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी व्यापारी वर्गाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याने प्रशासनाने टप्प्याटप्प्याने संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी सखोल बैठक घेऊन कारवाईचा आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत आदेश दिला, “शेवटच्या दंगेखोराला अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा. या घटनेत सहभागी असणाऱ्यांना धडा शिकवला गेला पाहिजे, अन्यथा भविष्यात असे प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता आहे.”
गुप्तचर यंत्रणांना सुधारण्याचे संकेत
मुख्यमंत्र्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या कार्यप्रणालीकडेही लक्ष वेधले. “ही घटना आम्हाला एक धडा देऊन गेली आहे. गुप्तचर यंत्रणा अधिक आधुनिक आणि त्वरित प्रतिसाद देणारी बनवणे ही काळाची गरज आहे. भविष्यात अशा घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी गुप्तचर विभागाला अधिक प्रशिक्षित व अद्ययावत करण्याचे निर्देश दिले जातील,” असे फडणवीस यांनी नमूद केले.
नागपूर दंगलीमधून राज्य सरकारने घेतलेले धडे, गुप्तचर यंत्रणांची कार्यक्षमता वाढवण्याचे प्रयत्न आणि पोलिस यंत्रणेच्या तत्पर कारवाईमुळे शहरातील शांतता पुन्हा बहाल होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.