दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मात्र या सोहळ्यात ‘गो बॅक’च्या घोषणांनी वातावरण ढवळून निघालं.
दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण ठरलेला कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र तसेच कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र मराठी भाषा, साहित्य, इतिहास आणि शिवरायांच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आले असून, विद्यापीठ स्तरावर मराठीचा ठसा उमटवणारे एक महत्वाचे पाऊल ठरत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना भाषेच्या मुद्द्यावर सडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले, भाषा ही संवादाचं साधन आहे, वादाचं नव्हे. मातृभाषेचा अभिमान बाळगत असताना इतर भारतीय भाषांचा सन्मान करायलाच हवा. आपल्याला इंग्रजीच्या मागे न धावत भारतीय भाषांचं जतन करायचं आहे. तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे, याचा सुद्धा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मराठी माणूस संकुचित विचार करत नाही, कारण शिवाजी महाराजांनी कधीच आपल्याला ते शिकवलं नाही.
Navneet Rana : भाषेच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर
तीव्र विरोध
मात्र, या गौरवाच्या क्षणाला दुसऱ्या एका आक्रमक घटनांनी गालबोट लागलं. याच कार्यक्रमादरम्यान SFI (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया) या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, ‘देवेंद्र फडणवीस गो बॅक’ अशी घोषणांची लाट उठवली. महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायदा आणि हिंदी भाषा सक्तीविरोधात त्यांनी आपला तीव्र विरोध नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, शिवाजी महाराजांचे नाव वापरून समाजात द्वेष आणि तेढ निर्माण केली जात आहे. मुस्लिम समाजाला टार्गेट करून सामाजिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे, असा रोष त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनात विद्यार्थ्यांनी बॅनर्स आणि फलक झळकावत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. ‘जनसुरक्षा कायदा मागे घ्या’, ‘भाषिक सक्ती बंद करा’, ‘छत्रपतींचा वापर करून समाजात विष कालवू नका’, अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे उद्घाटनाच्या भव्य सोहळ्यालाच एका वादग्रस्त वळणाची किनार मिळाली.
विचारधारेतील दांभिकता
या घटनेवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, SFI सारख्या डाव्या संघटनांनी केलेले हे आंदोलन म्हणजे त्यांचा छुपा अजेंडा आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणांनी देशद्रोहाचे बीज पेरले होते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू होणाऱ्या सामरिक अध्ययन केंद्राला विरोध करणे, हे त्यांच्या विचारधारेतील दांभिकतेचे दर्शन आहे. उपाध्ये म्हणाले की, विरोधकांना खऱ्या प्रश्नांवर चर्चा करायची नाही, म्हणूनच ते अशा अध्यासन केंद्रावर टीका करत आहेत.
या संपूर्ण घडामोडींनी एक मोठा वैचारिक प्रश्न उभा केला आहे की, भाषेचा सन्मान करायचा की राजकारणासाठी त्याचाच वापर करायचा? दिल्लीच्या शैक्षणिक भूमीत शिवरायांच्या नावाने उभारले गेलेलं हे केंद्र ज्ञान, संस्कृती आणि अभ्यासाचं प्रतीक ठरणार असताना, त्यावरून उठलेला वाद भारतीय शिक्षण प्रणालीतील राजकीय हस्तक्षेपाचे आणि भाषिक असुरक्षिततेचे प्रतिबिंब ठरतो आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र अधोरेखित होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव, विचार आणि परंपरा आजही देशभरात समतेचं, राष्ट्रप्रेमाचं आणि आत्मभानाचं शक्तिपीठ म्हणून सर्वच विचारसरणींसाठी केंद्रस्थानी आहे.